
दहिवड | वार्ताहर | Dahiwad
देवळा-मालेगाव रोडवरील खुंटेवाडी फाट्याचा बस स्टॉपसमोर दुचाकी व वाळूचा ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. अपघातात एक ठार तर एक जखमी झाला आहे...
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस नाईक ज्योती गोसावी यांनी देवळा पोलिसात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. वाखारी येथील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 15 डी. यू. 5309 हा ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाळू घेऊन खुंटेवाडी गावाकडून वाखारीचे दिशेला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत होता.
त्याचवेळी पिंपळगावकडून देवळा दिशेने येत असलेली दुचाकी एम. एच. 01 क्यू. 7266 ने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दहिवड येथील बँड काम करणारा युवक राकेश अनिल ठाकरे (18) हा जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला तर खर्डे येथील भूषण धना माळी हा त्याच्याबरोबर दुचाकी वर असलेला दुसरा युवक जखमी झाला आहे.
ट्रॅक्टर चालक वैभव दिनकर आहेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील तपास देवळा स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करीत आहेत.