वाहनधारकांनो सावधान ! लवकरच टोइंग कारवाई सुरु होणार

पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांची माहिती
वाहनधारकांनो सावधान ! लवकरच टोइंग कारवाई सुरु होणार

नाशिक । Nashik

शहरात सध्या वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून मनमानी पद्धीने रस्त्यावर वाहने पार्क केली जात आहेत. यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस पुन्हा एकदा टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्धार केला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून अवघ्या काही दिवसांतच टोइंग कारवाई सुरु होणार असल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी सांगीतले.

मागील दोन वर्षांपुर्वी शहरात टोईंग सुरू होते. परंतु त्या विरोधात नागरीकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. ठेकेदाराकडून नेमलेल्या कर्मचार्‍यांचे असभ्य व उध्दट वर्तन तसेच वाहन चालकांकडून येणार्‍या तक्रारींमुळे शहर पोलिसांचीही प्रतिमा मलीन होत होती. त्यामुळे शहर पोलिसांनी टोइंग कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यामुळे संपुर्ण शहरातबेशिस्त पार्किंचे प्रमाण चांगले वाढले असून याचा वाहतुक व्यवस्थेवर परिणात होत आहे. तसेच चालकांमुळे वाहतूक खोळंबा होण्याचे प्रमाण वाढले. कारवाई करुन, आवाहन करुनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग झोनमध्ये सर्रास वाहने उभी असल्याचे दिसते.

अशा बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय शहर पोलीस घेत आहे. ऑगस्ट महिन्यात निविदापुर्व बैठक झाली. त्यानंतर आता निविदा प्रक्रिया पुर्ण करून टोइंग सुरु होईल. यावेळेस नियमांची सर्व पुर्तता करणार्‍यामार्फत टोइंग कारवाई केली जाईल. तसेच शहरातील सर्व भागांमध्ये ही कारवाई केली जाणार आहे.

या कारवाईमार्फत वाहतूकीस शिस्त लागावी हा हेतू आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करुन वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com