नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटन महोत्सवाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मार्चमध्ये नाशिक विभागात पर्यटन महोत्सव हाेणार आहे. त्यामध्ये भंडारदरा, लळिंग किल्ला, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य आणि नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक तथा उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी ही माहिती दिली.

भंडारदरा (जि. अहमदनगर)-६ आणि ७ मार्च, धुळ्यातील लळिंग किल्ला-१४ मार्च, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य (जि. नाशिक)- २५ आणि २६ मार्च, नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्टमधील ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव- २७ आणि २८ मार्च.

महोत्सवामध्ये स्थानिक शेतकरी आणि आदिवासींनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील. ट्रेकींग, विविध विषयावरील मार्गदर्शन व्याख्याने होतील. छायाचित्र आणि चित्रकला, किल्ला बनवण्याची स्पर्धा घेण्यात येतील.

वाईन क्वीन, पक्षी निरीक्षण

ऐतिहासिक पोवाडा आणि पर्यटनस्थळांची ‘टूर', फॅशन-शो, वाईन क्वीन स्पर्धा, पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटनाबद्दल माहिती दिली जाईल. शेतीमालापासून विविध पदार्थ बनवले जातील. स्थानिक कलासंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. खाद्यपदार्थ आणि हस्तकलांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहील, असेही मुंडावरे यांनी सांगितले.

पर्यटनासाठीचा संपर्क

ई-मेल : ddtourism.nashik-mh@gov.in

संकेतस्थळ : www.maharashtratourism.gov.in