वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फतच टोसिलीझुमॅब, अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. मिळणार

वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फतच टोसिलीझुमॅब, अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. मिळणार

नाशिक । प्रतिनिधी

करोना रुग्णांसाठी टोसिलीझुमॅब आणि म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन हे औषध अत्यंत तातडीच्या उपचारासाठी आवश्यक असते. हे औषध रुग्णालयाला तातडीने उपलब्ध व्हावे यादृष्टीने नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका व नाशिक ग्रामीण या तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा इंजेक्शन वितरणाचे घटनाव्यवस्थापक डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टोसिलीझुमॅब व अ‍ॅ‍ॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शनच्या वितरणामध्ये कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ जाऊ नये व औषध रुग्णालयाला अतितातडीने उपलब्ध होण्यासाठी तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी मालेगाव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांनी वरील इंजेक्शन सक्षम अधिकार्‍यांकडून विहित नमुन्यामध्ये आवश्यक माहिती सादर करून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

या पद्धतीने बहुतांशी रुग्णालये कार्यवाही करत आहेत. परंतु काही वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांना किंवा त्यांचे नातेवाईक यांना वरील इंजेक्शनकरता प्रिस्क्रीपशन लिहून देत आहेत. ही बाब आपत्ती व्यवस्थापन कक्षाने वितरणासाठी आखून दिलेल्या पद्धतीचे उल्लंघन करणारी आहे. तरी वरील कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. तसेच या कार्यपद्धतीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदाअंतर्गत गंभीर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com