‘निमा’तील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी

निमा हाऊस
निमा हाऊस

सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन वादावर धर्मदाय उपायुक्तांच्या न्यायालयाने 1 ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर धर्मदाय उपायुक्तांच्या न्यायालयात दि. 21 सप्टेंबरला पहिली सुनावणी झाली होती. त्यानंतर वकिलांची नियुक्ती व विविध कागदपत्रांची पूर्तता यात दि. 25 व 29 सप्टेंबर या दोन तारखा झाल्या.

या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सुनावणी 1 ऑक्टोबरपासून केली जाणार असल्याचे धर्मदाय उपायुक्त कांचनगंगा सुपाते जाधव यांनी स्पष्ट केले. दि. 25 सप्टेंबर रोजीच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या वतीने वकीलपत्रांची नोंदणी करण्यात आली होती.

मात्र उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार कार्यकारिणीच्या सर्वच सदस्यांचे वकीलपत्र असणे अपेक्षित होते. त्यामुळे उर्वरित माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, तसेच नितीन वागस्कर, किरण पाटील यांचे वकील पत्र दाखल नसल्याने ते पुढील तारखेला हजर करून, सुनावणी सुरू करण्यात येईल, असे मंगळवारच्या सुनावणीत कोर्टाने स्पष्ट केले.

त्यामुळे पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुनावणीला जवळच्या तारखा पडत असल्याने प्रकरण लवकर निकाली निघेल असा विश्वास दोन्ही पक्षांकडून व्यक्त केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com