भोजापूरचे आवर्तन आज सुटणार

पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी आवर्तन; पांझरा तलाव भरणार
भोजापूरचे आवर्तन आज सुटणार

सिन्नर । प्रतिनिधी

भोजापूर धरणात शिल्लक असलेल्या 120 दशलक्ष घनफूट पाण्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी आवर्तन आज सोमवारपासून सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

गत पावसाळ्यात भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. रब्बी हंगामासाठी 10 फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र पावसाच्या पाण्याने विहिरींची पातळी उंचावलेली असल्याने शेतकर्‍यांकडून सिंचनासाठी पाण्याची पुरेशी मागणी झाली नाही. त्यामुळे या धरणात अद्याप 120 दशलक्ष घनफूट पाणी

शिल्लक आहे.

शिल्लक पाण्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना आवश्यक असलेले पाणी धरणात शिल्लक ठेवून उर्वरित पाण्यातून उन्हाळ आवर्तन सोडावे व त्यातून कालव्यालगत असलेले पाझर तलाव, बंधारे भरून द्यावे, अशा सूचना आ. माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

भोजापूर धरणात असलेल्या 120 दशलक्ष घनफूट पाण्यातून मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह पाच गावांना जुलैअखेर पुरेल इतके सुमारे 32 दशलक्ष घनफूट व 45 ते 50 दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन व गळती गृहीत धरून सुमारे 75 ते 80 दशलक्ष घनफूट पाणी भोजापूर धरणात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित सुमारे 40 दशलक्ष घनफूट पाण्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ आवर्तन सोडण्यात

येणार आहे.

10-12 दिवस आवर्तन

भोजापूर धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून 3 मे रोजी सुरू झालेले आवर्तन 10 ते 12 दिवस चालेल. पाणी योजनांबरोबरच जनावरांसाठीही पाझर तलाव व बंधारे भरून देण्यात येणार आहेत.

- बी. के. अचाट, शाखा अभियंता

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

भोजापूर धरणात मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजनांना पाणी ठेवण्याबरोबरच उर्वरित पाण्यातून शक्य तेवढे पाझर तलाव, बंधारे भरून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत. जनावरांचाही पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही आपली भूमिका असून त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com