चलनी नोटांच्या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
भारतीय चलनी नोटांचा ( Indian currency notes) रोमांचकारी इतिहास सांगणार्या जेलरोड येथील प्रदर्शनाला दोन दिवस मुदतवाढ मिळाली आहे. आता रविवार (दि.12) पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती संयोजकांनी दिली. प्रदर्शन विनामूल्य असून त्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे.
नोटांचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत तज्ज्ञांकडून दिला जात आहे. प्रेस व नोटांचा माहितीपट दाखवला जात आहे. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोटाही प्रत्यक्ष बघण्यास मिळत आहेत. यामुळे प्रतिसाद वाढतच आहे. आज शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. गेल्या तीन दिवसांत चार हजार नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनात खोट्या नोटा ओळखण्याचा स्वतंत्र कक्ष आणि मशीन आहे. ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
सन 1928 पासून नाशिकरोडच्या प्रेसमध्ये नोटांची छपाई सुरू झाली. तेव्हा पासपोर्ट, चेक, मुद्रांक छापणार्या आयएसपी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात असत. नंतर मागणी वाढल्यामुळे 1962 साली जेलरोडला स्वतंत्र प्रेस सुरू झाली. नाशिकरोड प्रेसमध्ये 1928 साली नोटा छापण्याअगोदर इंग्लंडहून नोटा छापून आणल्या जात असत. हैदराबादचा निजामही आपल्या चलनी नोटा मागवत असे. नाशिकमधील उत्कृष्ट हवामान, देशाशी असलेली कनेक्टिव्हिटी, गुन्हेगारीचे कमी प्रमाण, पायाभूत सुुविधा यामुळे नाशिकरोडला प्रेस सुरू करण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला. आज येथे एक रुपयापासून पाचशे रुपयांपर्यंतच्या अब्जावधी नोटा दरवर्षी छापल्या जातात.
भारतीय नोटांचा 18व्या शतकापासून ते आजपर्यंतचा प्रवास प्रदर्शनात अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रदर्शन पाहण्यास येत आहेत. नाशिकरोडच्या नोट प्रेसमध्ये इराक, नेपाळ, श्रीलंका, भूतान, पूर्व आफ्रिका, ब्रह्मदेशच नव्हे तर पाकिस्तान, चीननेही स्वातंत्र्यपूर्व काळात विविध किमतीच्या असंख्या नोटा छापून घेतल्या आहेत. त्या प्रदर्शनात आहेत. एक रुपयापासून दहा हजारांपर्यंतची नोट येथे आहे. इराकच्या तेरा वर्षांचा राजपुत्र बेबी फैजलचे चित्र असलेली नोट येथे आहे. तिची किमत आज तीस लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
प्रदर्शन चार विभागात असून नोटांच्या इतिहासाची व बदलत्या छपाई तंत्रज्ञानाची माहिती देणारा माहितीपट येथे दाखवला जात आहे. खोट्या नोटा कशा ओळखाव्यात याची सचित्र माहिती देणारे स्वतंत्र दालन आहे. प्रदर्शनात माहिती देण्यासाठी पंधरा तज्ज्ञ कर्मचारी-अधिकारी नियुक्त केले असल्याने नोटांचा इतिहास, वैशिष्ट्ये लहान मुलांनाही लगेच समजत आहे. लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकही आपल्या डायरीत नोटांचा इतिहास टिपताना आणि मोबाईलमध्ये फोटो काढताना दिसत आहेत. आधारकार्ड दाखवून प्रदर्शनात प्रवेश मिळत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी किमान एक तास लागत आहे.