आज ईद-उल-फित्र

घरीच होणार नमाज पठण; तयारी पूर्ण
आज ईद-उल-फित्र

जुने नाशिक । प्रतिनिधी

मोठा सण असलेल्या ईद-उल-फित्रची तयारी मुस्लीम बांधवांनी जवळपास पूर्ण केली आहे. उद्या शुक्रवारी ईद साजरी होणार आहे. यंदाही लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरीच नमाज पठण होणार आहे. ईदगाह मैदान तसेच मशिदींमध्ये परवानगी नसल्याने धार्मिक विधी घरोघरी होणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी ईदमुळे मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शुक्रवार अर्थात जुम्माच्या दिवशी मशिदींमध्ये विशेष नमाज पठण होते. यावेळी अरबी भाषेत खुतबा पठण करण्यात येतो. तर ईदच्या विशेष नमाजप्रसंगीही खुतबाचे वाचन होते,.म्हणून एकाच दिवशी दोन खुतबे आल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने ईदगाह मैदान तसेच मशिदींमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी न दिल्यामुळे भाविकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असली तरी सहकार्य करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.

बुधवारी पवित्र रमजानुल महिन्याचे 29 रोजे पूर्ण झाले म्हणून ईद-उल-फित्रच्या चंद्र दर्शनाची शक्यता होती. मात्र नाशिक शहर व परिसरात चंद्रदर्शन न घडल्यामुळे रमजान महिन्याचे 30 रोजी पूर्ण करून शुक्रवारी ईद साजरी करण्याचा निर्णय नाशिक सिरत कमिटी व चांद कमिटीने घेतला, अशी माहिती खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्यामुळे अत्यंत साध्या व धार्मिक पद्धतीने ईद साजरी होणार आहे. आज सायंकाळीदेखील मुस्लीमबहुल भागांमध्ये ईदचा चंद्र पाहण्यासाठी घरांच्या टेरेसवर तसेच इमारतींवर व उंचीच्या ठिकाणी मुस्लीम बांधवांनी तसेच महिला व पुरुष यांनी, लहान मुलांनी गर्दी केली होती.

शिरखुर्माची लगबग

ईद-उल-फित्रच्या खाद्यपदार्थांमध्ये विशेष आकर्षण असलेल्या शिरखुर्माची तयार करण्याची लगबग मुस्लीमबहुल भागात दिसत होती. लॉकडाऊनपूर्वीच भाविकांनी सुकामेवा व इतर साहित्य खरेदी करून ठेवले होते. तर आताही जी घरपोच सुविधा मिळत आहे त्या माध्यमातूनदेखील भाविकांनी साहित्य मागवून घेतले आहे. उद्या ईद-उल-फित्रच्या दिवशी सकाळी मुस्लीम बांधव घरांमध्ये दूध व सुकामेवापासून शिरखुर्मा तयार करतील. तसेच शेवई तयार करण्यात येईल.

काही ठिकाणी गुलगुलेदेखील तयार होतात. गोड पदार्थांवर विषेश फातेहा पठाण करून प्रसाद ईद भेटायला येणार्‍या भाविकांना देण्यात येतो. ईदच्या दिवशी एकमेकांना मुबारक बाद देण्यात येते. मात्र सध्या बंद असल्यामुळे सोशल मीडिया किंवा फोनच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. आजही सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर चांद मुबारकच्या शुभेच्छा देत मोठ्यांकडून आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी विशेष दुवादेखील करण्यात आली. करोना हद्दपार व्हावा तसेच जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी भाविकांनी दुवा केली.

घरांमध्ये नमाज

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधव ईदची नमाज मशिदीमध्ये न जाता घरीच पठाण करणार आहेत. विविध धर्मगुरूंनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवली आहे. ईदची विशेष नमाज घरी होत नसली तरी त्याव्यतिरिक्त नफिल नमाज पठण होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com