आज पवित्र शब-ए-कद्र

आज पवित्र शब-ए-कद्र

जुने नाशिक । प्रतिनिधी Old Nashik

वर्षभरातील तीन पवित्र रात्रांपैकी एक रमजान ( Ramjan )महिन्यात येणारी अत्यंत पवित्र रात्र अर्थात शब-ए-कद्र ( Shab E Qadr )आज (दि.28) साजरी होणार आहे. यानिमित्त शहरातील सर्व मशिदी, दर्गाह, दुकाने व अनेक घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान शबे कद्रनिमित्त भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त रात्रभर मशिदी व घरांमध्ये प्रार्थना करण्याची प्रथा आहे. याच रात्री पवित्र कुरान शरीफ ग्रंथ पृथ्वीवर अवतरला होता, अशी माहिती उलेमांनी दिली आहे. दरम्यान रमजान महिन्यात सुरू असलेल्या तरावीह नमाजचे नेतृत्व करणार्‍या उलेमांचा आज रात्री सत्कार करण्यात येणार आहे. शबे कद्रचा सण साजरा करताना शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व मुस्लिम बांधवांनी पालन करावे, कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन स्थानिक धर्मगुरु मौलाना इब्राहिम कोकणी यांनी केले आहे.

आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई

शबे कद्र व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट व्हायरल करू नये, तसे आढळल्यास कडक पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी दिला आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाणे येथे प्रमुख उलेमा, मुस्लिम बांधव तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

बैठकीस भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक दिलीप ठाकूर, हाजी वसीम पीरजादा, एजाज रजा मकरानी, हाजी जाकीर अन्सारी, अंजली शिंदे, शरयू डांगळे आदी उपस्थित होते. दरम्यान सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश वायरल करणारे किंवा अफवा पसरविणारे विरुद्ध पोलीस प्रशासन सतर्क असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.