विद्यार्थी सतत क्रियाशील राहण्यासाठी..!

विद्यार्थी सतत क्रियाशील राहण्यासाठी..!

अर्जुन ताकाटे । (राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक)

आजपासून शाळा सुरु होत आहेत Schools Reopen . मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सुरु राहाणे का आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

करोनामुळे ऑनलाईन शिक्षण online education due to corona सुरु झाले. त्याआधी आम्ही फोन वापरणार नाही म्हणून शाळा स्तरावर अनेक ठिकाणी मुलांना शपथ देण्यात आली होती. ती निकाली निघाली. ऑनलाईन शिक्षणातील काही अडचणी आज पावेतो सुटलेल्या नाहीत.

ज्यांच्याकडे साधने नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी ओटयावरची, झाडाखालची, वस्तीवरची, मित्र शाळा असा प्रयत्न केला पण त्याचा अर्थ 100% शिक्षण झाले असे आत्मविश्वासाने कोणीही सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल शाळा सुरु असाव्यात. भलेही त्या 100 % किवा पूर्ण वेळ देखील भरणार नाहीत. परंतु शाळा भरण्याची व भरवण्याची मानसिकता पालक, शिक्षक आणि प्रशासन या सर्वांची झाली पाहिजे.

याची आवश्यकता का आहे या बाबत काही मुद्यांचा नक्कीच विचार व्हावयास हवा. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संपर्क, सहसंबध येत नसेल तर विध्यार्थी विकास होणार कसा? बाळाच्या जन्मापासून किमान त्याला चालता येईपर्यत आई जितकी महत्वाची तितकीच 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळा व त्या माध्यमातून शिक्षक महत्वाचे आहेत.

सर्वच मुलांचे माता - पिता सुशिक्षित व शिक्षणप्रेमी असतील असे नाही. असले तरी त्यांना अध्यापनाचे कौशल्य असेल असेही नाही. समजा तेही असले तरी त्यातील किती जण आपल्या पाल्यासाठी अधिक वेळ देतील हेही सांगता येणार नाही. अध्ययन-अध्यापन क्रिया होण्यासाठी ही सतत चालणारी क्रिया आहे. विद्यार्थी सतत क्रियाशील ठेवण्यासाठी शाळा सुरु झाल्या पाहिजे.

शाळेत कधीही न गेलेल्या व्यक्तीचा जीवनपट आणि शाळेत गेलेल्या व्यक्तीचा जीवनपट याचा फरक पाहिल्यास तो नक्कीच आपल्याला योग्य दिशा देईल. शिक्षण न घेतल्याचे अनिष्ट परिणाम पहावयास मिळाले आहेत. हे टाळण्यासाठी शाळेच्याद्वारा दिले जाणारे शिक्षण चालू असावेत. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करावयाचा असल्याने शाळेशिवाय दुसरा उपाय नाही असे नाही. पण प्रारंभिक तरी शाळा आवश्यकच आहे की ज्यातून प्राथमिक शिक्षण होते.

ज्या मोबाइलचा वापर करून शिक्षण प्रक्रिया चालू ठेवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो काळानुरुप योग्य म्हणावा लागेल. पण त्याचे जेवढे चांगले परिणाम होतात तितकेच त्याचे विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरीकतेवर झाल्याची उदाहरणे आहेत. हे काही अंशी टाळण्यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सुसंंवाद होणे, विचारांची देवाणघेवाण होणे, सल्लामसलत हे सर्व शाळेतच होऊ शकते.

कोणतीही सवय लागली तर ती मोडणे अवघड. मुलांना चांगल्या सवयी लावण्याचे कार्य शिक्षक मोठ्या मेहनतीने करतात. आज शाळेत येणे, स्वाध्याय सोडविणे, सराव परीक्षा देणे, कौशल्य संपादन करणे या बाबी फार दूर गेल्याचे चित्र आहे. विद्यार्थी कुटुंबात जितका वेळ राहतो त्यापेक्षा अधिक काळ तो शालेय मित्रपरिवार आणि शाळेत राहतो. शिक्षक हे त्याचे आदर्श असतात. शिक्षकांचे बोलणे, चालणे, वागणे, राहणीमान अभ्यासूवृत्ती यासारख्या अनेक बारीक सारीक गोष्टींचे अनुकरण विद्यार्थी स्वत: सतत करीत असतो.

मुलांचा दीड वर्षापेक्षा अधिक काळ शाळेशिवाय गेला आहे. मुले सध्या काय करतात, याचा सर्वे केल्यास सध्याचे चित्र समजेल. छोटी छोटी मुले देखील व्यसनाच्या आधीन गेले आहेत. हे दुष्परिणाम थांबविण्यासाठी शाळा सुरुच पाहिजे त्यास अधिक विलंब नको.

शाळेचा पोषण आहार खाऊन दिवस काढणारी देखील लाखो मुले समाजात आहेत याचाही विचार झाला पाहिजे.

शिवाय शिक्षणप्रक्रियेवर हजारो जणांचा प्रपंच अवलंबून आहे हे ही विसरुन चालेल का?

Related Stories

No stories found.