बाजार समित्यांवर प्रशासक नेमणार; सहकार सचिवांचे आदेश

बाजार समित्यांवर प्रशासक नेमणार;  सहकार सचिवांचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आल्यानंतर आता जिल्ह्यातील बाजार समित्यांवरही ( APMC )प्रशासकीय राजवट ( Administrative Rule )येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सुमारे 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर 22 एप्रिलनंतर प्रशासक यांची नियुक्ती होणार आहे.

राज्याच्या सहकार सचिवांनी याबाबतचे आदेश काढले (The Secretary of State for Co-operation issued the order )असून राज्यभरातील जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे या आदेशात म्हटले आहे. यामुळे दिंडोरी व लासलगाव वगळता तसेच घोटी, सटाणा, नामपूर, उमराणे सोडून सर्व बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एकूण 17 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून त्यांच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षी संपुष्टात आलेली आहे. मात्र, गतवर्षी असलेल्या कोविड संकटामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी आदेश काढलेले होते. तर, काही बाजार समित्यांच्या संचालक मंडळांनी मुदतवाढ घेतलेली आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होत असतानाच ग्रामपंचायती व सोसायटयांच्या निवडणुका झाल्याशिवाय बाजार समित्यांच्या निवडणुका घेऊ नये, असे आदेश मुंबई न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार बाजार समित्यांचे कार्यरत संचालक मंडळ व प्रशासक यांना 21 जानेवारीच्या आदेशान्वये 23 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याच आदेशाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर देण्यात आलेल्या आदेशान्वये बाजार समित्यांमध्ये कार्यरत संचालक मंडळाला 22 एप्रिल 2022 च्या पुढे मुदतवाढ देणे शक्य होणार नाही, अशी शासनाची खात्री झाल्यानंतर पणन अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करावी, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या बाजार समित्यांचा मुदतवाढीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, अशा बाजार समित्यांना त्यातून वगळण्यात यावे, असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे पिंपळगाव, चांदवड, सिन्नर, मनमाड, येवला, नादंगाव आदी बाजार समित्यावर प्रशासक नियुक्त होण्याचा अंदाज आहे. लासलगाव बाजार समितीची मुदत 11 मे 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. तर, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल अद्याप आहे. त्यामुळे या दोन्ही बाजार समितीबाबत काय निर्णय होतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.