विशेष ब्लॉग : वेळ वैर्‍याची आहे, आता सावरलेच पाहिजे !

विशेष ब्लॉग : वेळ वैर्‍याची आहे, आता सावरलेच पाहिजे !

- डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक

पाण्याने भरलेल्या दोन ल्याटेक्स ग्लोव्हजमध्ये एका पेशंटचा हात धरून त्या पेशंटला धीर देण्याचे ब्राझीलमधले एक चित्र दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाले. मन हेलावणारे हे चित्र असले तरी विचलित करणारेदेखील होते.

डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ कसा अपुरा पडतोय याचे हे ज्वलंत उदहरण. करोना विषाणूने ब्राझीलला नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर टाकले आहे. दिवसागणिक वाढणार्‍या 70,000 एवढ्या केसेस आणि काही दिवसांत 500,000 पर्यंत जाऊ पाहणारा मृतांचा आकडा, भयावह परिस्थिती दर्शवतो.

आता थोडे आपल्याच जिल्ह्याकडे वळूया. रोज चार हजारांपर्यंत जाणार्‍या केसेस फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यातही शहरातला आकडा मोठा. अपुरे पडणार्‍या खाटा, रुग्णालये, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडिसीव्हरसारखे औषध!

या सगळ्याचा तुटवडा आहे याच बातम्या आपण वाचतोय. कारणे अनेक पण प्रमुख्याने रुग्णांची वाढती संख्या. बोटे दाखवायचीच झाली तर खूप ठिकाणी जागा आहे. ती एकमेकांकडे पण दाखवू शकतो, पण ही परिस्थिती खरेच बोटे दाखवण्याची आहे का? ही परिस्थिती आहे खंबीर पावले उचलण्याची.

दिवसाला अनेक लोक अनेक फोन हाताळताहेत. भाऊ बेड मिळतो का बघ रे कुठे? रांगेत उभे राहतोस का माझ्यासाठी? रेमडिसीव्हर हवेय, दोन दिवस झाले आहेत आरटीपीसीआरचा रिपोर्ट आला नाही अजून... औषधे आणून देतोस का? घरात सगळेच बाधित आहेत... जेवणाच डबा कुठे मिळेल का? या आणि अशा अनेक दूरध्वनी कॉल्सला आपण सामोरे जातोय.. जमेल तशी अनेकजण मदतही करताहेत आणि तरीसुद्धा या परिस्थितीत मार्ग निघत नाहीये किंवा असे म्हणूयात की मार्ग काढायला आपण कुठेतरी चुकतोय.

आपल्या देशात, आपल्या शहरात करोना धडकून आता वर्ष झालेय. मध्यंतरी केसेस कमी झाल्या खर्‍या पण त्याचबरोबर शासकीय यंत्रणेसकट आपण सर्वजण गाफिल झालो. लहान मुलांनादेखील तोंडपाठ असलेली त्रिसूत्री आपण धुडकावून लावली.

‘करोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे’ असे म्हणत आपण बेभान झालो. पण ते काळजी घेऊन करायला हवे हे मात्र आपण विसरून गेलो. लग्न समारंभांना होणारी गर्दी, मित्रमंडळींकडे होणार्‍या पार्ट्या, बैठका, कॉन्फरन्सेस, टूर्स, गेट-टुगेदर, कट्ट्यावर भेटणारी टोळकी, ठिकठिकाणी होणारी गर्दी याला काही पारावारच उरला नव्हता.

अधूनमधून केसेस येतच होत्या पण त्याकडे ‘फार काही होत नाही’ असे म्हणून आपण दुर्लक्ष केले आणि मार्चच्या शेवटाकडे परिस्थिती एकदम गंभीर झाली. रुग्णसंख्या वाढू लागली तसे सगळे अपुरे पडू लागले.

नियोजनाने आपण अनेक प्रश्‍न सोडवू शकलो असतो हे आपल्याला एका वर्षभरात शिकता आले नाही. आपल्याकडे वेळ होता तेव्हा आपण आपला स्टाफ वाढवू शकलो असतो. ट्रेनिंग देऊन नर्सेस, वॉर्ड बॉईज, पॅरामेडिक स्टाफ तयार करून नवीन फळी निर्माण करता आली असती. होमिओपॅथी, आयुर्वेदच्या डॉक्टर्सना विश्‍वासात घेऊन त्यांना या प्रणालीमध्ये सामावून घेता आले असते.

औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स निर्माण करून ठेवता आले असते. मात्र या सगळ्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले गेले. आपण कसा करोनाच्या आकडेवारीवर विजय मिळवला आहे, कसा गो करोना म्हणत त्याला घालवले आहे हेच सिद्ध करण्यात आम्ही व्यस्त राहिलो.

आता औषध लागत नाहीत, कोविड सेंटरची गरज नाही म्हणत असलेल्या सोयीसुविधा आपण उद्ध्वस्त करून टाकल्या. हे सगळे आपण जेव्हा करत होतो तेव्हा मात्र जगभरात अनेक ठिकाणी येणार्‍या दुसर्‍या-तिसर्‍या लाटांचा उद्रेक आपल्याला दिसत होता.

ब्रिटनमध्ये होणारे कडक लॉकडाऊन आपण बघत होतो. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर होणारे लसीकरण आपण गंमत म्हणून बघत होतो. बघता बघता ब्राझीलमध्ये करोनाने धारण केलेले रौद्ररूप आपण बघत राहिलो. आज ब्राझीलमध्ये मृतांना दफन करायलादेखील जागा नाही हे वास्तव आहे.

आपल्याकडेही परिस्थिती फार वेगळी नाही. बेड मिळेल या आशेने वाट बघणारे रुग्ण, व्हेंटिलेटरसाठी वणवण करणारे आप्तस्वकीय, औषधे मिळतील म्हणून रांगा लावणारे नातेवाईक, डेथ सर्टिफिकेटची वाट बघणारे खिन्न झालेले कुटुंबीय, जागा नाही म्हणून स्मशानभूमीत मिळेल त्या जागी पेटवली जाणारी चिता, ही सगळी परिस्थिती आपण ओढवली की काय असा विचार करायला लावणारी आहे.

आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की जणू काही वैद्यकीय व शासकीय यंत्रणा कोसळून पडल्या आहेत. सध्याची परिस्थिती ‘धरले तर चावतये अन् सोडले तर पळतेय’ अशी झाली आहे.

कठोर निर्बंध लावू, लोकांनी लक्ष नाही दिले तर कठोर पावले उचलावी लागतील, अशा फक्त धमक्या हे प्रशासन देत राहिले. लॉकडाऊन व्हावा की नाही यावर दुमत असू शकते पण प्रादुर्भाव वाढणार्‍या आणीबाणीच्या परिस्थितीत लवकरात लवकर खंबीर पावले उचलणे अपेक्षित होते.

आर्थिक चक्र सुरू ठेवून कठोर निर्बंधाची पावले जर डिसेंबर-जानेवारीमध्येच काही प्रमाणात उचलली गेली असती तर कदाचित अतिकठोर निर्णयापर्यंत जावे लागले नसते.

आपल्याकडील नागरिकांनादेखील नको तो फाजील विश्‍वास असतो आणि हाच अतिविश्‍वास घातक ठरतो. ‘मला काही होणार नाही’, ‘मला मास्क सहन होत नाही’, ‘मी कुठे जातच नाही’ अशा अविर्भावात वावरणार्‍या आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती आपलेच आप्तस्वकीय आज या विषाणूशी लढत आहेत.

व्यवस्था कमी पडते म्हणून प्रशासनाने काही खासगी रुग्णालयांतदेखील कोविड हॉस्पिटल्स सुरू केलेली आहेत. मात्र या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत की नाही याकडेही डोळेझाक झाली आहे. तरीसुद्धा डॉक्टर्स मंडळी आपला जीव रोज पणाला लावून काम करत आहेत.

बारा ते सोळा तास पीपीई किट घालून नाशिकच्या उकाड्यामध्ये काम करणे सोपे नाही. न खाता अगदी पाणीसुद्धा न पिता वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वजण या परिस्थितीला सामोरे जाताहेत. मास्क घालून घालून कानामागे जखमा झाल्या आहेत. अनेक डॉक्टर्स, नर्सेसना कोविड होऊन गेला आहे. त्याची झळ त्यांच्या घरच्यांना बसली आहे. जीव मुठीत धरून हे सगळे जण काम करताहेत आणि काही तर एवढे करूनसुद्धा ही व्यवस्था कमी पडत असल्याची खंत बाळगताहेत.

उशीर झाला असला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. नाशिकमध्ये असलेल्या सर्व उच्च अधिकार्‍यांनी एकत्र येणे आणि एकमुखाने काम करणे खूप गरजेचे आहे. तीन यंत्रणा जेव्हा स्वतंत्रपणे कार्य करतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते हे आपण सगळ्यांना दाखवून दिले आहे.

हे थांबणे गरजेचे आहे. नुसत्या बैठका घेऊन सगळ्यांनी सोबत काम करूयात असे ठरवून होत नाही, तर एकमेकांना विश्‍वासात घेऊन, संवाद साधून एकदिलाने काम करणे अपेक्षित आहे. नाशिकमध्ये असलेल्या तीन यंत्रणा अतिस्वतंत्रपणे काम करताय याची खिल्लीसुद्धा इतर सनदी अधिकार्‍यांमध्ये उडवली जाते, हेही भान ठेवून सगळ्यांनी एकदिलाने काम करावे व जबाबदारीची जाण दाखवावी हे अपेक्षित आहे.

खूप काम करणे आणि ते योग्य दिशेने करणे यातला फरक ओळखावा. नाशिकला सक्षम नेता मिळत नाही ही नाशिकची शोकांतिका म्हटली जाते. आज पालकमंत्र्यांनी ही सक्षम भूमिका बजवावी या आशेने सर्व नाशिककर त्यांच्याकडे बघत आहेत.

करोनासारख्या आजाराशी सामना करून आणि तरीदेखील जबाबदारी ओळखत पालकमंत्र्यांना रस्त्यावर उतरावे लागते कारण यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नाही हेच दिसते. लोकांना शासनाचा आधार वाटावा अशी भूमिका बजावली गेली पाहिजे. योग्य त्या सोयीसुविधा त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत.

या घटकेला कदाचित यात मर्यादा असतीलही पण त्यावर कशी मात करायची याचा दूरदृष्टीने विचार केला गेला पाहिजे. जे होऊन गेलेय, जो काळ आपण घालवला आहे तो परत येणार नाही.

येणार्‍या पुढच्या काळाला आपण कसे सामोरे जाणार आहोत याची मात्र दखल सर्व जबाबदार व्यक्तींनी घ्यायलाच हवी आणि अर्थात या जबाबदार व्यक्तींमध्ये सर्वात प्रमुख घटक ठरतो तो म्हणजे या शहराचे, जिल्ह्याचे नागरिक! नागरिकांनीदेखील उद्दामपणा न करता संयमाने परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. यंत्रणेला अपेक्षित असलेली साथ हे नागरिकच देऊ शकतील, ती त्यांनी द्यावीच. झाल्या त्या चुका पुरे झाल्या, वेळ वैर्‍याची आहे आता सावरलेच पाहिजे!

- डॉ.वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com