येवला शहरात संचारबंदी कडक करा : पालकमंत्री भुजबळ

सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवावे
येवला शहरात संचारबंदी कडक करा : पालकमंत्री भुजबळ

येवला । प्रतिनिधी Yevla

शहरात रुग्णसंख्या वाढत असून त्यावर पुढील आठ दिवसात नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नाही तर कठोर पाऊल उचलावी लागनार असून प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल. ज्या भागात पेशंट अधिक आहे अशा भागात संचारबंदी कडक करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली.

यावेळी भुजबळ म्हणाले की, अतिदक्षता म्हणून येवला शहर आणि तालुक्यात कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधे पुरवण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेंटमेंट झोनमध्ये कडक नियोजन करण्यात यावे असे सांगत मास्क न वापरणार्‍या तसेच नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रसंगी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

शहर व ग्रामीण भागात ज्या भागात रुग्ण सापडले आहे, त्या भागात संचारबंदी कडक करण्यात येऊन त्या परिसरातील करोना रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधे पुरवण्यात यावीत.लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठविण्यात यावे ऑक्सिजन बेडसवर डीसीएचसी मध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवण्यात यावे. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या.

नगरसूल येथे संपूर्ण २८ बेड ला कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करावी त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येवला शहरात करोना सोबतच इतर साथ रोगांचा पावसाळ्यात शिरकाव होऊ नये यासाठी अतिदक्षता म्हणवून प्राधान्याने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन शहर नियमित स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी शेतकरी खरीप हंगाम पीक कर्जवाटप, मका खरेदी व खत वाटपा बाबत आढावा घेतला. त्यानुसार येवला तालुक्याला असलेल्या ८० कोटींच्या इष्टांक पैकी ३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. येवल्याला कर्जमाफीची १५० कोटी तर निफाड तालुक्याला १३३ कोटी रुपये रक्कम प्राप्त होणार असून ही संपूर्ण रक्कम पीककर्जासाठी वितरित करावी अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी अधिकार्‍यांना दिला.

मका खरेदीसाठी गोडाऊन शिल्लक नसेल तर तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन सर्व शेतकर्‍यांची मका खरेदी करावी, खरेदी प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी काट्यांची संख्या वाढवावी व खरेदी प्रक्रिया बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यासोबत काळाबाजार व लिंकिंग करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com