
नवीन नाशिक | Nashik
नवीन नाशकतील मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात विभागिय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या नवीन नाशिक अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस पथकाच्या सहकार्याने अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या कारवाईत मनपा काही अधिकाऱ्यांनी फळ तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकत अर्वाच्च भाषेत वर्तन केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
करोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना नोकरी गमवावी लागल्याने कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी रस्त्यावर फळभाजी विक्री व्यवसाय करावा लागत आहे . या लहान व्यावसायिकांना या मोहिमेचा मोठा फटका बसला असून उपजीविकेचे साधनच हिरावले गेल्याने या व्यावसायिकांच्या रोजीरोटी वर संक्रात आल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
नवीन नाशिकच्या पवननगर,त्रिमूर्ती चौक,शिवाजी चौक,उपेंद्रनगर,माऊली लॉन्स परिसरात लहान-मोठ्या विक्रेते, दुकानदार, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने ही कारवाई केली गेली. यापूर्वी प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अनेकदा फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जात असून त्यांची पाठ फिरताच पुन्हा विक्रेते दाखल होतात. नुकत्याच झालेल्या प्रभागसभेतही नगरसेवकांनी वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून वारंवार येणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागिय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक दशरथ भवर, अतिक्रमण अधिकारी प्रदीप जाधव (नवीन नाशिक), श्रीराम गायधनी,(पश्चिम विभाग), दत्ता आहेर (पूर्व विभाग), मयुर काळे (सातपूर विभाग) यांच्यासहचार विभागांचे ट्रक, दोन पोलिस जीप, सहभागी झाले होते.