
नाशिक | Nashik
जिल्ह्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या (Road Accidents) घटनांमध्ये वाढ होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा सिन्नर-संगमनेर दरम्यान भीषण अपघात होऊन सटाणा (Satana) येथील तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सटाणा शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, सटाणा शहरातील मिथुन उर्फ पप्पू डोंगरे हे अक्षय्य तृतीयेचा सण करून पुणे येथे बहिणीकडे आपल्या आई, पत्नी, आणि दोन मुलांसह घर भरणीसाठी जात असताना सिन्नर-संगमनेरजवळ (Sinnar-Sangamaner) दुभाजकाला त्यांची गाडी धडकली.
यावेळी गाडी अनेकदा उलटल्याने त्यात पप्पू डोंगरे यांचा तीन वर्षीय मुलगा श्रीयांश याचा मृत्यू (Death) झाला. तसेच या अपघातात पप्पू डोंगरे यांच्या आईच्या कमरेला जब्बर मार लागला तर पत्नीच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली. याशिवाय पप्पु डोंगरे व त्यांचा मोठा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी डोंगरे कुटुंबीयांना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघाताचे वृत्त सटाणा येथील पप्पू डोंगरे यांच्या मित्रांना समजताच त्यांनी संगमनेरकडे धाव घेतली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या डोंगरे कुटुंबाला नाशिक (Nashik) येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर अपघातात मृत्यू झालेल्या तीन वर्षीय श्रीयांशवर सटाणा येथील जुन्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.