नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात विविध ठिकाणी एकाच दिवशी तिघांंचे बेवारस मृतदेह आढळून आले. पंचवटीतील रामकुंड परिसरात काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूला पटांगणामध्ये एका 55 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गंगाघाट परिसरात पायी गस्त घालत असताना त्यांना सकाळी 10 च्या सुमारास सदर ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरा मृतदेह पंचवटीतील पाथरवटलेनमध्ये एका दुकानाच्या गाळ्यासमोर ओट्यावर आढळून आला. याबाबत पोलीस नाईक डीपी गावीत यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते गस्त घालत असताना त्यांना सबंधीत ठिकाणी 45 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबतही पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तिसर्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास उपनगर परिसरात व्यापारी बँकेच्या फुटपाथवर आढळून आला. याबाबत पोलीस शिपाई स्वप्निल सपकाळ यांनी खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यास जागृक नागरिकाने कळवल्याने सहकार्याबरेाबर सपकाळे तेथे पोहोचले. या ठिकाणी 55 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. या मृत्यूमध्ये बेगरांची संख्या मोठी आहे. यामुळे बेघरांमध्ये करोनाचा फैलाव झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यासह शहरात सध्या खुनाचे सत्र सुरू असून हे मृतदेह इतर ठिकाणांवरून शहरात आणून टाकले जात आहेत काय, याबाबतही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.