तीन हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
तीन हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अन्न व औषध प्रशासन, नाशिक व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी नाशिक व अन्न चाचणी प्रयोगशाळा यांच्या संयुक्त पथकाने नाशिक शहरात येणारे व नाशिक जिल्ह्यातून मुंबईला वितरीत होणार्‍या दूध भेसळ तपासणीसाठी संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण चार वाहनांतील 66,763 लिटर दुधाच्या साठ्याची जागेवरच तपासणी केली.

त्यातील मे. प्रवरा मिल्क प्रोसेसिंग, कासार दुमला (ता. संगमनेर) यांचे वाहन (एच 48 एजी 4692) ची भाटवाडी गाव, सिन्नर-घोटी हायवे (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे तपासणी केली असता त्यात भेसळकारी पदार्थांच्या प्राथमिक चाचणीत भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यातील दुधाचा अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे 3020 लिटर दूध (अंदाजे 1 लाख 13 हजार 250 रुपये) साठा नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला.

या मोहिमेत एकूण चार अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल. ही धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. तरी अन्न व्यवसायिकांनी दूध या अन्नपदार्थात भेसळ करू नये. भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न औषध प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे सर्व दूध संकलन व शीतकरण केंद्रांनी कायद्यानुसार आवश्यक अन्नसुरक्षा परवाना घेऊनच दूध खरेदी-विक्री करावी व सर्व मोठ्या दूध प्रक्रिया अन्न व्यावसायिकांनीही परवानाधारक दूध संकलन, शीतकरण केंद्राकडूनच दूध खरेदी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com