एसटीच्या ३ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी

एसटीच्या ३ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी

नाशिक | प्रतिनिधी

करोनाचा वाढता प्रकोप थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. टप्याटप्प्याने सगळयांचे लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारीही लसीकरणात मागे नाही. नाशिक विभागातील ५० टक्के एसटी कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले...

नाशिक विभागातील १३ आगारामार्फत एसटीची प्रवाशी वाहतूक केली जाते. आजमितीला संपूर्ण विभागात ५ हजार ६१८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहे.

त्यामध्ये अधअधिकारी-११, पर्यवेक्षक (वर्ग- २)- ५४, पर्यवेक्षक (वर्ग- ३)- ५९, वर्ग तीन कर्मचारी- ५ हजार ९४ तर वर्ग चार कर्मचारी- ४०० यांचा समावेश आहे. त्यापैकी २ हजार ६५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. तर २ हजार ९६४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असला तरी, एसटीची सेवा अविरत सुरु आहे. लॉकडाउनमध्येही नाशिक विभागातील बसेस तसेच मनुष्यबळ ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

यासह इतर कामगिरीवर असलेल्या ५१० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ३२० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात करून ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहे. तर १४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३९ बाधीत कर्मचारी सध्या उपचार घेत आहे.

दरम्यान, चालक-वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणसाठी एसटी प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयासह आरोग्य विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे.

मात्र, संबंधित यंत्रणा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी आपल्या स्तरावर व्यवस्था करत आहे. त्यातच विभागीय कार्यालयाने लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितल्याने एसटी कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रसाठी शोधाशोध सुरू आहे.

अधिकारी-कर्मचारी लसीकरण

प्रशासकीय- ३३९

कार्यशाळा- ४९२

चालक- ९१९

वाहक- ९०४

एसटीच्या डेपोनिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जात आहे. निम्म्या कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. शंभर टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी एसटी प्रशासन प्रयत्नशील आहे.

जहाँआरा शेख, कामगार अधिकारी, एसटी महामंडळ, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com