नाशिकच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

नाशिकच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे (Rasika Shinde), माया सोनवणे (Maya Sonawane) व प्रियांका घोडके (Priyanka Ghodke) या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे (BCCI) सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या तिघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

अंतिम संघ निवडीसाठी शनिवार २४ सप्टेंबर पासून पुणे येथे संभाव्य खेळाडूतील चाचणी स्पर्धा सामन्यांत झालेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावरच ही निवड आली आहे. तसेच यापूर्वीच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील या खेळाडूंची लक्षणीय कामगिरी देखील विचारात घेण्यात आली.

नाशिकच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

माया सोनवणेची गेल्या हंगामाच्या सुरुवातीसच भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या संभाव्य ३५ खेळाडुं मध्ये निवड झाली होती. नाशिकची महिला क्रिकेटपटू मायाची  प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली होती.  माया ही उत्तम फिरकीपटू असून ऑक्टोबर २०२१ अखेर डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय  सामन्यांच्या  स्पर्धेत माया ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

त्या स्पर्धेत मायाने ५ सामन्यात २१ षटकांत केवळ ३.३३ च्या सरसरीने ७० धावा देऊन ४ गडी बाद केले. चार षटकांत १२ धावांत ३ बळी अशी तिची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. 

या सगळ्या लक्षणीय, सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची लागोपाठ दोन हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती. जलदगती गोलंदाज व उत्कुष्ट फलंदाज रसिका शिंदेने यापूर्वी महाराष्ट्रतर्फे एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

सुरत येथेच महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर  २०२१  दरम्यान  १९ वर्षांखालील राज्यस्तरीय महिलांसाठी ५० षटकांची एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतही रसिका खेळली होती. २०१७ सालापासूनच आंतर शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केल्यापासुन विविध वयोगटात रसिका महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते आहे.

प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, नोव्हेंबर २०१९ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतांना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०१८-१९ च्या हंगामात ,टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकाविली आहेत.

पुदुचेरी येथे २०१९ साली झालेल्या तेवीस वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने सिक्किम वर 108 धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्यात प्रियांका घोडके च्या ५९ चेंडूतील दमदार ६१ धावांचा मोठा वाटा होता.  प्रियांका ने देखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे भावना गवळी या प्रशिक्षकामार्फत मुलींसाठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.

सुरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत

११ ऑक्टोबर- दिल्ली,

१४ ऑक्टोबर-कर्नाटक,

१६ ऑक्टोबर-हरयाणा.

१८ ऑक्टोबर – माणिपूर,

२० ऑक्टोबर – हिमाचल प्रदेश,

२२ ऑक्टोबर - आसाम.

या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, तिघींच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, पदाधिकारी, सदस्य व प्रशिक्षक यांनी खास अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com