तीन बिबट्यांना पुन्हा जंगलात साेडणार
नाशिक

तीन बिबट्यांना पुन्हा जंगलात साेडणार

नैसर्गिक अधिवासात सोडणार

Bharat Pagare

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये पकडून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) दाखल केलेल्या बिबट्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात येणार आहे. पाच पैकी तीन बिबट्यांना पुन्हा नाशिकमध्येच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये नाशिक वन विभागाचे अधिकारी मुंबईत जाऊन बिबट्यांना ताब्यात घेणार आहेत.

नाशिकमधील दारणा नदीच्या परिसरातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. या संघर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आजवर ५ मानवी मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात नाशिक पश्चिम आणि सिन्नर वन विभागाने एकूण १३ बिबटे पकडले आहेत.

यामधील पाच बिबट्यांना बोरिवली नॅशनल पार्कमधील 'बिबट्या निवारा केंद्रा'त पाठविण्यात आले होते. यामध्ये दोन प्रौढ नर-मादी आणि आठ ते दीड-दोन वर्षांपर्यतच्या तीन नर पिल्लांचा समावेश आहे. यामधील तीन बिबट्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने नॅशनल पार्कमधील 'बिबट्या निवारा केंद्रात' पाठविण्यात आलेल्या पाच बिबट्यांपैकी तीन बिबट्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती नाशिक पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली.

यामध्ये दोन नर पिल्ले आणि एक प्रौढ मादीचा समावेश असून येत्या दोन दिवसांमध्ये हे बिबटे ताब्यात घेऊन त्यांना नाशिकमधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com