शहरात चार अपघातांत तीन ठार, एक जखमी

शहरात चार अपघातांत तीन ठार, एक जखमी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात विविध ठिकाणी झालेल्या अपघात ( Accidents )शृंखलेत तीन जन ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विविध हद्दीत पोलीस तपास करत आहेत.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ( Mhasrul Police Station ) हद्दीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल प्रकाश मिस्तरी (वाघ) (रा. स्वामी विवेकानंदनगर, इरिगेशन कॉलनीजवळ, मखमलाबाद) यांच्या आई मीनाबाई प्रकाश मिस्तरी (वय 71) या चाणक्यपुरी सोसायटीसमोरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनचालकाने त्यांना जोराची ठोस मारली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोड येथे घडला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत उपनगर पोलिसांनी ( Upnagar Police Station) दिलेल्या माहितीनुसार, उपनगर नाका सिग्नलजवळ फिर्यादी सुधीर श्रावण चंद्रमोरे (रा. टागोरनगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यांचे मेहुणे प्रथमेश जिंदा अहिरे (वय 40, रा. आम्रपालीनगर, कॅनॉल रोड, नाशिकरोड) हे घराकडे येत असताना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपनगर नाका येथे आले. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एचआर 69 सी 6737 या क्रमांकाच्या आयशर ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून एमएच 15 सीजी 5119 या क्रमांकाच्या मोटारसायकलीस पाठीमागील भागाचा कट लागला. त्यामध्ये प्रथमेश अहिरे हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आयशर ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.

तिसऱ्या घटनेबाबत माहिती देताना सातपूर पोलीसांनी ( Satpur Police Station )दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास बाजीराव शार्दूल (रा. प्रबुद्धनगर, सातपूर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शार्दूल यांचे भाऊ सुभाष बाजीराव शार्दूल (वय 42) हे ‍दि. 1 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पपया नर्सरी रोडवरील एका हॉस्पिटलजवळून पायी जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारवरील चालकाने शार्दूल यांना समोरून जोराची ठोस मारली. यात फिर्यादीच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कारचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

अपघाताचा चौथा प्रकार नासर्डी पुलाजवळ घडला. फिर्यादी मुस्ताक सिराजउद्दीन बागवान (रा. भक्ती सोसायटी, साहिल लॉन्सच्या मागे, नाशिक) यांच्या मुली सना व नुरी या एमएच 15 एचबी 9916 या क्रमांकाच्या मोपेडने भारतनगरकडून भक्तीनगरकडे येत होत्या. दरम्यान, नासर्डी पुलाजवळ रस्ता ओलांडत असताना एमएच 15 एचपी 4927 या क्रमांकाच्या गाडीवरील चालकाने भरधाव वेगात बागवान यांच्या मुलीच्या गाडीस धडक दिली. त्यात सना हिला दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ( Mumbai Naka Police Station) गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.