घोटी येथे तीन घरे जळून खाक

काही क्षणात संसार बेचिराख
घोटी येथे तीन घरे जळून खाक

घोटी । Ghoti

घोटी येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया काल रात्री अडीच वाजता दरम्यान लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराच्या वर नुकसान झाले असून याठिकाणी राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.

घोटी येथील पश्चित्ररायनगर भागात रेल्वे ट्रॅक च्या बाजूला कातकरी समाजाचे तीन कुटुंब वास्तव्याला आहे. जगन बाबू हीलम, देवराम जगन हीलम, सावळीराम शंकर राऊत, रत्नाबाई सावळीराम राऊत, महादू सावळीराम राऊत, तनिशा सावळीराम राऊत असे 3 कुटुंब राहत होते.

तीन झोपडयामधील 1 कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असून उर्वरित 2 कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना मध्यरात्री 2.30 वाजे दरम्यान घरातील दिव्यामुळे आग लागायला सुरवात झाली त्याचवेळी शेजारील जनार्दन नवले यांनी प्रसंगावधान राखल्याने आरडाओरड केली व कुटुंबातील सर्वांना उठवले व त्वरित कुटुंब घराबाहेर खेचल्याने 5 जणांचे प्राण वाचले. झोपडीत 20 कोंबड्या, रोख रक्कम, मच्छीमारी करिता लागणारे साहित्य , कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे सर्वच्या सर्व काही क्षणातच बेचिराख झाले.

जवळपास 50 हजाराच्या वर नुकसान झाले आहे. आग येवढी मोठ्या प्रमाणात होती की महामार्गावरील टोल नाक्यावरून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने समाधान गोईकने, निलेश भोर त्वरित घटनास्थळी पोहोचले. आणि आजूबाजूच्या घरातून साहित्य घेऊन आग विझवली. परंतु झोपडीतील काहीच शिल्लक राहिले नाही. हातावरचे काम व मजुरी करून पोट भरत असलेल्या मच्छीमारी चा व्यवसाय असून या लोकडाऊन मुळे सर्व धंदे ठप्प झालेला आहे त्यात उर्वरित संसार पण उध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांत हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

घटनास्थळी जाऊन सकाळी घोटी ग्रामपालिकेचे सरपंच रामदास भोर, विकास जाधव, प्रशांत रुपवते ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी जाऊन भेट दिली. नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांना संसारपयोगी वस्तू आणि किराणा माल भरून दिल्या जाणार असल्याचे सरपंच भोर यांनी सांगितले. घोटी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले व चौकशीचे आदेश दिले. पुढील तपास शरद कोठुळे, शीतल गायकवाड करीत आहेत.

झालेली घटना खूप दुर्दैवी असून झोपड्या बेचिराख झाल्या आहेत. हातावरचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला मायेचा आधार घोटी ग्रामपालिकेच्या वतीने दिल्या जाणार असून आवश्यक ती सामग्री आम्ही या कुटुंबाला देणार आहोत. त्यांना कसलीही कमतरता पडू दिली जाणार नाही. ग्रामपालिका बरोबरच गावातील दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन मदतीमध्ये खारीचा वाटा उचलावा म्हणजे भरघोस मदत या कुटुंबाना देता येईल.

-रामदास भोर, प्रभारी सरपंच घोटी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com