नाशिक । Nashik

अवकाळी पावसाने जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे अतोनात नूकसान झाले आहे.

३ हजार ४०० हेक्टरवरील पिके आडवी झाली असून २१७ गावातील पाच हजार ४६० शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. चांदवड, सटाणा तालुक्यात द्राक्ष व कांद्याला फटका सहन करावा लागला आहे. अंतिम पंचनामे पुर्ण झाल्यानंतर शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

गेल्या चार,पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. एक ते दीड तास त्याने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार चांदवड तालुक्यात द्राक्षांचे सर्वाधिक नुकसान झाले, तर सटाणा तालुक्यात कांद्याला फटका बसला. पावसामुळे कांदा लागवड देखील लांबली असल्याने शेतकर्यांचे नियोजन बिघडणार आहे. जिल्ह्यातील ५,४६० शेतकर्यांना त्याचा फटका बसला असून २,५०८ हेक्टर वरील द्राक्षांचे तर ८९० हेक्टरवरील कांदा आणि इतर पिके असे ३३९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात २१७ गावे बाधित झाली आहेत.

जिल्ह्यात जवळपास २ लाख ७० हजार ७६० शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरवलेला आहे. ज्या शेतकर्यांनी विमा उतरवला नाही त्यांना मदत देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन पाठवला जाईल.

- छगन भुजबळ , पालकमंत्री