सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे तेरा हजार तक्रारी

परीक्षार्थींच्या तक्रारींची पडताळणी सुरु
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे तेरा हजार तक्रारी

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्‍या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने त्यांना गैरहजर दाखविण्यात आले.

13 हजार पैकी तब्बल 9 हजार तक्रारी याच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात नापास होण्याची भीती सतावत असताना विद्यापीठाने वस्तुस्थिती तपासून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘खर्‍या’ तक्रारी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सुरवातीच्या टप्प्यामध्ये कमी विद्यार्थी असल्याने त्यांना जास्त तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. 16 एप्रिलपासून रोज 100 पेक्षा जास्त विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधून परीक्षेसाठी लॉगइन होत नाही, अशा तक्रारी केल्या होत्या.

मात्र, या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा न दिल्याने त्यांची अनुपस्थिती लागलेली आहे. त्यामुळे सध्या तरी हे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, अशीच स्थिती आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात या तक्रारी आल्याने परीक्षा विभागाने 16 ते 20 एप्रिल दरम्यान परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी नोंदविण्याची मुदत दिलेली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण 13 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

यापैकी चार हजार तक्रारी सोडविलेल्या प्रश्नांपैकी कमी प्रश्न सबमिट झाले आहेत, उत्तर सेव्ह झाले नाही, कमी गुण पडले अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. नऊ हजार तक्रारी या लॉगइन न झाल्यामुळे परीक्षा देता आली नसल्याच्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com