मका हमीभाव नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

मका हमीभाव नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

पंचाळे | वार्ताहर | Panchale

आधारभूत किमतीत भरडधान्य (grains) खरेदीची मुदत दि. ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार (Sudhir Tungar) यांनी पारित केला आहे...

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून दरवर्षी तालुका पातळीवर असलेल्या खरेदी-विक्री संघांच्या माध्यमामार्फत दरवर्षी धान व भरडधान्य खरेदी प्रक्रिया राबवली जाते.

नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik District) प्रामुख्याने अनेक शेतकऱ्यांचा (Farmers) हमीभावाने मका (Maize) विक्रीसाठी पूर्वीपासून कल आहे. यावर्षी मक्यासाठी शासनाने 1 हजार 870 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा मक्यासाठी तीनशे ते चारशे रुपये भाववाढीचा फायदा होणार आहे.

सध्या खुल्या बाजारात मक्यासाठी पंधराशे रुपयांपर्यंत भाव आहे‌. मार्केटिंग फेडरेशनच्या (Marketing Federation) वतीने 11 सप्टेंबरपासून 31 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन मका खरेदीची नोंदणीची मुदत होती. मात्र शेतकऱ्यांचा ऑनलाइन मका नोंदणीला (Online maize registration) अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

हमीभावाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर येथील जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांनी राज्य शासनाकडे केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन भरडधान्य खरेदी नोंदणीची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.

सध्या मका सोंगणीची कामे सुरू असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी खुल्या बाजारात चौदाशे ते पंधराशे रुपये दराने मका विक्री सुरू केली आहे. त्यामुळे शासनाने मका खरेदी सुरु केल्यास भविष्यात खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी प्रक्रिया तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

धान व भरडधान्य खरेदी मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत असून यानंतर ही मुदत वाढवून दिली जाणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मका धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करून शासनाच्या हमी भावाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, सटाणा, नामपूर, देवळा, नांदगाव या आठ केंद्रांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत चार हजार शेतकऱ्यांनी भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव योजनेचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी.

- विवेक इंगळे, मार्केटिंग फेडरेशन अधिकारी नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com