Think Positive : श्रद्धांजलीचे बॅनर हटवून; शहरात लागले करोनामुक्त झालेल्यांचे बॅनर्स

Think Positive : श्रद्धांजलीचे बॅनर हटवून; शहरात लागले  करोनामुक्त झालेल्यांचे बॅनर्स

सटाणा I शशिकांत कापडणीस

'आम्ही कोरोनातून बरे झालो आहोत, तुम्ही पण लवकरच बरे व्हाल' अशा आशयाच्या कोरोनामुक्त झालेल्या शहरवासीयांच्या बॅनर्सकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. परिस्थितीवर आपलं पूर्णपणे नियंत्रण नसतं, मात्र त्यावर आपला प्रतिसाद काय असणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे...

आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते, हाच संदेश देत येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या सटाणा शहरातील नागरिकांना केलेले सकारात्मक आवाहन व नागरिकांनी त्यांना तात्काळ दिलेला प्रतिसाद जिल्ह्यात कौतुकाचा विषय होत आहे...

सटाणा शहरात कोरोनाने आपला विळखा घट्ट रोवला असून, दररोज कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून तर मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मुख्य चौकांत, रस्त्यांवर भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करणारे असंख्य बॅनर झळकले होते.

यामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये व त्यांच्या नातलगांमध्ये भीती पसरते व त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो, ही बाब लक्षात घेऊन, येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरवासीयांना हे बॅनर्स हटविण्याचे व त्याऐवजी कोरोनामुक्त झालेल्या शहरवासीयांचे 'आम्ही कोरोनातून बरे झालो आहोत, तुम्ही पण लवकरच बरे व्हाल' असा संदेश असलेले बॅनर त्यांच्या फोटोसह लावण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाकडे सकारात्मकतेने पाहून व त्याचे गांभीर्य ओळखून शहरातील मल्हार रोड युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी तात्काळ शहरातील सर्व भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर काढले.

यासाठी युवा कार्यकर्ते सागर सोनवणे, राहुल शेलार, अमोल देवरे, अमित हेडा, परेश देवरे, हर्षल जाधव, अनिल सोनवणे आदींसह शहरातील अनेक युवकांनी त्यांना प्रतिसाद दिला.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 'आम्ही कोरोनातून बरे झालो आहोत, तुम्ही पण लवकरच बरे व्हाल' असा संदेश देणारे व कोरोनामुक्त झालेल्या शहरातील प्रतिष्ठित, पोलीस अधिकारी, डॉक्टर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचे छायाचित्रे व नावे असलेले बॅनर्स शहरातील मुख्य चौकांत झळकविले.

एका पोलीस अधिकाऱ्याचा सकारात्मक उद्देश व त्याचा तातडीने अवलंब करण्याचा शहरवासीयांचा निर्णय रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिलासा देणारा ठरला असून या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'व्हाट्स अप'वर मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो व माहिती व्हायरल करू नये

कोरोनाबाधित रुग्णाला आपल्या तब्येतीची माहिती देण्यासाठी व स्वतःच्या मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. मात्र, असे निदर्शनास आले आहे की व्हाट्सअप वर अनेक नागरिक मृत्यूच्या बातम्या व्हायरल करीत असून श्रध्दांजलीचे फोटोही स्टेटसवर ठेवीत आहेत. यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्य खचत असून सोशल मीडियावरही श्रद्धांजली वाहू नये.

- जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार, बागलाण

कोरोना म्हणजे मृत्यू, हा गैरसमज काढून वैयक्तिकरित्या स्वच्छता, सुरक्षित अंतर व मास्कचा योग्य वापर करून व्यायाम व योग्य आहार या सर्वांच्या जोरावर आपण कोरोनासारख्या आजारातून मुक्त होऊ शकतो. शासन, प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत, त्या प्रयत्नांना यश आणणे हे आपल्याच हातात आहे. पोलीस प्रशासनाने 'आम्ही बरे झालो तुम्ही बरे व्हाल' असे बॅनर लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाचे आभार व लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

- डॉ. सौ. सीमा खैरनार, सटाणा

स्वतः च्या आईला कोरोनाच्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्यात यश आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत आई बरी झाली. यामुळे या सकारात्मक उर्जेचा सटाणा शहरासाठी उपयोग करण्याचे ठरविले. सटाणा शहरवासीयांनी दिलेल्या प्रतिसादामुळे प्रभावित झालो. हाच उपक्रम स्वतः च्या निभगूळ, ता.शिंदखेडा या गावीही राबविला असून याचा योग्य परिणाम दिसत आहे.

- देवेंद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, सटाणा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com