
नाशिक | प्रतिनीधी | Nashik
नाशिक शहरात (nashik city) चोरीच्या (theft) घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यात चोरट्यांची नजर आता मोटरसायकलीकडे (Motorcycle) जास्त झाल्याचे दिसून येत आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये (parking) पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली.
याबाबत अमोल भगवान रहाटे (रा. श्रीरामकुंज सोसायटी, तिगरानिया कॉर्नर, द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये एमएच १५ ईएम ६९६४ या क्रमांकाची ३० हजार रुपये किमतीची हीरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) मोटारसायकलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन गटात राडा
ड्रेनेज लाईनच्या (Drainage line) कारणावरून दोन गटांत हाणामारीची घटना वडाळा गावात घडली असून, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली तक्रार शिरीन इसाक शेख (रा. सादिकनगर, वडाळा गाव) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे, की शेख या पती व तीन मुलांसह मदिनानगर येथे गोठ्याच्या शेजारी राहतात. त्यांचे पती हे इलेक्ट्रिशियन आहेत. शेख यांच्या प्लॉटमधून संशयित आरोपी आवेश कोकणी गुलाम कोकणी, नूर कोकणी (रा. कोकणीपुरा, भद्रकाली व इतर दोन इसम तेथे आले.
त्यावेळी फिर्यादीच्या पतीने "आमच्या प्लॉटमधून गेलेली ड्रेनेज लाईन काढून घ्या,” असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यांनी फिर्यादीच्या पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण (beating) केली. त्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी फिर्याद गुलामगौस जलालउद्दीन कोकणी (रा. कोकणीपुरा, भद्रकाली) यांनी दिली आहे.
त्यात म्हटले आहे, की आरोपी इसाक शेख, भाऊ मोईन शेख व फरीद शेख (सर्व रा. वडाळा गाव, नाशिक) हे मदिनानगर गोठ्याजवळ आले व त्यांनी फिर्यादीस सांगितले, की आमच्या प्लॉटमधून गेलेली ड्रेनेज लाईन काढून घ्या. यावरून कुरापत काढून फिर्यादीस मारहाण केली, तसेच इसाक शेख यांनी फिर्यादीला लाकडी दांड्याने मारले. त्यामध्ये डोक्यास जखम झाली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण
बहिणीची छेड का काढली, असे म्हणून कुरापत काढून चार जणांनी तरुणाच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना नीलगिरी बाग येथे घडली. याबाबत शुभम सुनील बलसाने ( रा. निलगिरी बाग, औरंगाबाद रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी बंटी जगताप, सूरज ऊर्फ गोट्या पाडोळे, दर्शन खैरनार व ओम भुजड (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे बलसाने यांच्या घराजवळ आले व "तुझ्या भावाने माझ्या बहिणीची छेड का काढली?” असे म्हणून कुरापत काढून फिर्यादी बलसाने व त्याच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादीचा भाऊ शरद व त्याची पत्नी यांनाही तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.