'हे' आहेत नवनिर्वाचित महापालिका प्रभाग समिती सभापती

'हे' आहेत नवनिर्वाचित महापालिका प्रभाग समिती सभापती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली...

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवडणूक झाली.

यात पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप, पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी डॉ. दिपाली कुलकर्णी, नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदी वत्सला खैरे , नवीन नाशिक प्रभाग सभापतीपदी सुवर्णा मटाले, सातपूर प्रभाग समिती सभापती पदी योगेश शेवरे व नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदी प्रशांत दिवे यांची निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली.

सुवर्णा मटाले बिनविरोध

नवीन नाशिक सभापतीपदी संख्याबळ व राजकीय गणित बघता सेनेचाच सभापती होणार हे निश्चित होते. मात्र भाजपच्या नगरसेविका छाया देवांग यांनी फ़ॉर्म भरल्याने चित्र बदलते की काय? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी देवांग यांनी माघार घेतल्याने मटाले यांचा मार्ग मोकळा झाला. अखेर सुवर्णा मटाले यांची बिनविरोध निवड झाली.

योगेश शेवरे दुसऱ्यांदा सभापती

नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभाग समिती सभापतीची निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांनी माघार घेतल्याने मनसेचे योगेश शेवरे यांनी बिनविरोध निवड झाली. शेवरे दुसऱ्यांदा सभापती पदी विराजमान झाले आहेत.

मच्छिंद्र सानप बिनविरोध

पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पदावर भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र.३ चे नगरसेवक मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचवटी विभागात भाजपाची एकहाती सत्ता असल्याने सलग पाचव्या वर्षी देखील सभापतीपद भाजपकडे राहणार यात कुठलीही शंका नव्हती मात्र यंदाच्या पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने या निवडणुकीत सभापतीपदासाठी रस्सीखेच होती. अखेर यात नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी बाजी मारली.

पश्चिम प्रभाग सभापतीपदी वत्सला खैरे

पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या वत्सला खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बहुमत नसल्याने भाजप उमेदवार (BJP Candidate) योगेश खैरे यांची मदार नगरसेविका ॲड. वैशाली भोसले यांच्या मतावर होती. मात्र, त्यांनी सहकार्य न केल्याने भाजप आमदार सीमा हिरे यांचे दिर असलेले नगरसेवक योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली.

यावेळी नगरसचिव राजू कुटे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यानंतर या सर्व सभापतींचा सत्कार पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला. तसेच मनपा पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com