खते, बियाणांची टंचाई जाणवणार नाही - कृषी मंत्री भुसे

वाटपाचे योग्य नियोजन
खते, बियाणांची टंचाई जाणवणार नाही - कृषी मंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांबरोबरच कृषी विभागदेखील सज्ज झाला आहे. खते व बियाणांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेत वाटपाचे नियोजन केले जात आहे. करोनाची मरगळ झटकत खरीप हंगामाच्या मशागतीस शेतकरी बांधवांनी वेग दिला आहे. चांगले पर्जन्यमानाचे संकेत लक्षात घेता यंदा खरीप हंगाम चांगला येईल, अशी आशा असल्याचे स्पष्ट करत कृषिमंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध बियाण्याचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.

कृषी विभागाने सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांचे बियाणे प्रात्यक्षिक वाटपाचे नियोजन केले आहे. आर्थिक दुर्बल घटकासह मागासवर्गीय, विधवा, करोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना मोफत बियाणे वाटप केले जाणार आहे. यासाठी बियाणे वितरण करणार्‍या कंपन्यांनी सीएसआर निधीतून सामाजिक बांधिलकी जपत बियाणे उपलब्ध करून दिल्याची माहिती भुसे यांनी दिली.

कृषिमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत टेहरे, पाटणे, चिंचावड, आधार खु., नांदगाव, वाके, सौंदाणे, दाभाडी, पिंपळगाव, जळगाव गा., बेळगांव, रावळगांव, सातमाने, दुंधे, तळवाडे, पांढरूण, ढवळेश्वर, आघार बु. या गावातील आर्थिक दुर्बल घटकासह गरजू शेतकर्‍यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, माजी जि. प. सदस्य सुरेश पवार, संजय दुसाने, रामा मिस्तरी, चेतन पवार, शशी निकम, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, गोकुळ अहिरे, अनिल निकम, अविनाश निकम, दीपक मालपुरे, पंकज पाटील, केदारे आदींसह कृषी विभागाचे अधिकारी, सेवक, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनासाठी उत्साहाचे वातावरण असून पेरण्या वेळेवर होण्याची चिन्हे दिसत आहे. राज्यात बियाण्यासह रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. यंदा युरियासारख्या खताचा 75 हजार मेट्रीक टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. जैविक बिजप्रक्रिया करून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकर्‍यांसाठी बाजरी-40 प्रकल्प, मका-30, तूर-2, मूग-5, उडीद-1 तर सोयाबीनचे-2 प्रकल्प अधिक उत्पन्नवाढीसाठी घेण्यात आले आहेत.

प्रत्येक प्रकल्पामध्ये 25 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली असून त्यांना देखील बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बियाण्याबरोबरच बिजप्रक्रिया, रासायनिक खताचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन आणि पणन व्यवस्था याचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.

कृषी विद्यापिठाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण बोली भाषेत एकूण 48 गावांत शेतकरी शेतीशाळा घेण्यात येत असल्याची माहिती तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली. तालुक्यातील जवळपास 87 गावातील सुमारे 2940 शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाचा लाभ देण्यात येणार असला तरी शेतकर्‍यांनी पेरणीची घाई न करता किमान 80 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com