बिबट्या
बिबट्या
नाशिक

बिबट्या-मानव संघर्ष होणार कमी

एक ऑगस्टपासून ‘जुन्नर पॅटर्न’

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील दारणा नदीपात्रात मानव आणि बिबट्या संघर्षाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनविभागाने ‘जुन्नर पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वन्यजीव संशोधकांच्या पथकाने नाशिक शहरात जाऊन काही निष्कर्ष मिळवले आहेत. स्वयंसेवी संस्था, शाळा, जिल्हा व नाशिक शहर प्रशासनाच्या मदतीने जनजागृती कार्यक्रम लवकरच राबवण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्या व मानव संघर्षाची परिस्थिती नाशिकसारखी होती. त्यामुळे ‘जुन्नर पॅटर्न’ निफाड व आणि गोदावरी नदीकाठालगत राबवला जाणार आहे. बिबट्या व मानव संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी जागरुकता हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि तो जुन्नरमध्ये यशस्वी झाला आहे. हाच पॅटर्न राज्यात इतरत्रही राबवला जात असून तोच आता दारणा नदीपात्रातही राबवला जाईल. जागृतीमुळे बिबट्यांचे आणि मानवी संघर्षाचे भय कमी होईल. जनजागृती कार्यक्रम नाशिकसाठीही उपयुक्त ठरेल, अशी माहिती पश्चिम वनविभागाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक (एपीसीसीएफ) सुनील लिमये यांनी दिली.

नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण हल्ल्यातून वाचले आहेत. गेल्या एका महिन्यापासून दारणा नदीपात्रात चोवीस तास बिबट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जवळपास ४० ट्रॅप कॅमेर्‍यांसह २० पिंजरे बसवण्यात आले आहेत. आतापर्यंत दारणा काठाजवळ दोन बिबटे पकडण्यात आले आहेत. तथापि हा संघर्ष कमी करण्यासाठी बिबट्या पकडणे हाच एकमेव मार्ग नसून लोकांच्या प्रबोधनाद्वारे ‘बिबट्यांबरोबर सहवास’ हा पर्याय अवलंबला पाहिजे, असे वन अधिकार्‍यांनी म्हटले आहे. ते पाहता वनविभागाने नाशिकमध्ये ‘जुन्नर पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभर मोहीम

शालेय मुलांपासून वर्षभर मोहीम राबवली जाईल. बिबट्याचे बदलते अधिवास, बिबट्याचे वर्तन, शिकार करण्याची शैली, बिबट्या प्रतिक्रियांविषयी, मनुष्याकरिता आणि इतर गोष्टींबद्दल त्यांना जागरुक केले जाईल. शालेय मुले बिबट्या राजदूतप्रमाणे काम करतील आणि आपापल्या गावात आणि भागात जागरुकता करतील. वन्यजीव संशोधक नाशिकमध्ये अभ्यास करून अहवाल तयार करतील. जागृती करण्यासाठी ही वर्षभर मोहीम असेल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com