जूनमध्ये पाणीकपातीचे संकट घोंगावणार

बाष्पीभवनामुळे अडचण
जूनमध्ये पाणीकपातीचे संकट घोंगावणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने महापालिकेने एप्रिल महिन्यापासूनच पाणीकपातीचे नियोजन केले होते. मात्र पालकमंत्री दादा भुसे यांनी तूर्तास पाणीकपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने मे महिन्यातही नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले असले तरी वाढत्या तापमानाचा परिणाम गंभीर होऊ लागल्याने पाण्याची उपयुक्तता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जून महिन्यात पाणीकपात करावी लागण्याची भीती अधिकारी व्यक्त करत आहेत.

मेअखेरपर्यंत पडणारी उष्णता व इतर बाबींचा अंदाज घेऊन जूनमध्ये पाणीकपात अटळ असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने अतिरिक्त 300 दशलक्ष घनफूट पाणी देण्याची तयारी दर्शवल्याने त्याआधारे महापालिकेने 20 ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे.

उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता येत्या जून महिन्यात पाणीकपात करावीच लागेल, असे स्पष्ट संकेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. जून-जुलैमध्ये आठवड्यातून एक दिवस तर ऑगस्टमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेने गंगापूर धरण समूहातून अतिरिक्त 200 दशलक्ष घनफूट पाण्याच्या मागणीचे पत्र जलसंपदा विभागाला पाठवले होते. जलसंपदा विभागानेदेखील त्यास मंजुरी दिली होती. आता महापालिकेने आणखी दारण धरण समूहातून 100 दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली असून त्यासदेखील जलसंपदा विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त 300 दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.

मात्र मेअखेर तसेच जूनच्या प्रारंभी उष्णतेची तीव्र लाट आल्यास त्याचा मोठा परिणाम धरणातील पाण्यावर होणार असून बाष्पीभवनाने पाणी साठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मेच्या दुसर्‍या आठवड्यातच उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. तसेच या आठवड्यात उष्णतेचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने पाणीकपातीचे संकट अधिक गडद झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com