
सिन्नर | प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बायपासलगत असलेल्या माळेगाव एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉकमध्ये जाण्यासाठी कट आऊट मिळणार असल्याने या भागातील उद्योजकांंची समस्या दूर होणार आहे. यामुळे सीमाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नाशिककडे जाताना मोहदरी घाटाच्या उजव्या बाजूला नव्याने अनेक कारखाने तयार झाले आहेत. दिवसेंदिवस या भागात कारखान्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, नाशिककडून किंवा सिन्नरकडून या कारखान्यांकडे जाण्यासाठी उद्योजकांना व कामगारांना मोठी कसरत करावी लागते. मोहदरी घाट सुरू होताना या ‘जे’ ब्लॉकमध्ये महामार्गावर कट आउट नसल्याने उद्योजक व कामगार यांना ये-जा करण्यासाठी विरुद्ध बाजूने जीवघेणा प्रवास करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे, सीमा पदाधिकारी व उद्योजकांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आ. कोकाटे यांनी एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉकमध्ये जाण्या-येण्यासाठी महामार्गावर डिव्हायडर कट आउट करुन दोन्ही बाजूस गतीरोधकाची व्यवस्था करण्याच्या सूचना महामार्ग प्रशासनाचे पाटील यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक श्याम निकम यांनी महामार्गावरील स्थळाचे निरीक्षण केले असून कट आऊटची जागा निश्चित केली आहे.
त्यानूसार त्यांनी महामार्ग प्रशासनाला ना हरकत दाखल दिला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात या कामास सुरुवात होणार असून ‘जे’ ब्लॉकमध्ये जाण्यासाठी महामार्गावर कट आऊट मिळणार आहे. या कामामुळे उद्योजक व कामगार यांची ये-जा करण्याची गैरसोय दूर होणार आहे. यामुळे उद्योजक व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ. कोकाटे यांनी यासाठी सहकार्य केल्याने सीमाच्या पदाधिकार्यांनी त्यांचे आभार मानले. एमआयडीसी ठाण्याचे निरिक्षक निकम यांनी प्रत्यक्ष स्थळी येत निरिक्षण करतांना सीमाचे सचिव बबन वाजे, मुकेश देशमुख, रतन पडवळ, राहुल नवले, लक्ष्मण डोळे, विशाल गोजरे, रोमित पटेल, प्रशांत वाघ, सुनील खतोडे, गोडगे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.