नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कोर्टात गेल्यावर पक्षकाराचा खटल्यांमध्ये जय-पराजय होतच असतो. परंतु पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये. न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी केले. नाशिक जिल्हा हा न्यायदानात रोल मॉडेल होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नाशिकरोड न्यायालयाला 31 वर्षांनंतर स्वतःची हक्काची इमारत मिळाली आहे. महसूल आयुक्त कार्यालय मार्गावर दिवाणी-फौजदारी न्यायालयाची भव्य व आधुनिक इमारत उभी राहिली आहे. तीचे उदघाटन आज व्हर्च्युअल पध्दतीने न्या. प्रभूदेसाई यांनी फित कापून केले. जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे अध्यक्षस्थानी होते. न्या. गणेश देशमुख, न्या. एस. पी. नाईकनिंबाळकर, न्या. व्ही. ए. हिंगणे, न्या. पी. एन. आवळे, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, नाशिकरोडचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड, कोर्ट व्यवस्थापक अशोक दारके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक इमारतीला मंदिराचा दर्जा मिळतोच असे नाही. नाशिकरोडचे हे न्यायमंदिर केवळ इमारत राहू नये, न्यायमंदिर व्हावे. न्यायमंदिराचे पावित्र्य जपणे आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे, ते पार पाडावे, असे नमूद करुन न्या. प्रभूदेसाई म्हणाल्या की, न्यायव्यवस्था ही पिरॅमिडप्रमाणे असून जिल्हा न्यायालय हा त्याचा पाया आहे.

या कोर्टात वेळेत न्याय मिळाला तर हाय कोर्ट व सुप्रिम कोर्टात जाण्याची वेळ पक्षकारांवर येणार नाही. कोर्टापुढे खटले व फाईली वाढणे ही वाईट गोष्ट नाही. उलट न्यायव्यवस्थेवर लोकांचा अजूनही विश्वास असल्याचे ते प्रतीक आहे. खटल्यांची संख्या वाढतच असून न्यायाधीशांची संख्या तुलनेत अपुरी आहे.

अशा परिस्थितीतही आपणच मार्ग काढला पाहिजे. कोर्टात जाण्याऐवजी लोकअदालत, प्रबोधन, तडजोड या मार्गाने खटले निकाली निघतील यासाठी प्रयत्न करावेत. न्यायाधीश आणि वकील पूर्ण तयारीने आल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा, श्रम वाचून ताण कमी होईल. त्यामुळे न्याययंत्रणेवरील विश्वास, न्यायालयाची प्रतिमा उंचावेल.

न्या. अभय वाघवसे म्हणाले की, तीन एकरवरील आणि दोन वर्षात तयार झालेल्या या इमारतीसाठी चौदा कोटी रुपये खर्च आला आहे. न्यायाधीशांची आठ दालने, पुरुष व महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रुम, पक्षकारांना बसण्याची तसेच पार्किंगची प्रशस्त सुविधा ही या इमारतीची वैशिष्ट्ये आहेत.

नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. सुदाम गायकवाड यांनी प्रास्तविक केले. नाशिकरोडला वरिष्ठ दिवाणी कोर्ट आणि दोन जिल्हा कोर्ट यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्याला न्या. प्रभुदेसाई यांनी अनुकूल प्रतिसाद दिला.

एस. एन. भालेराव यांनी सूत्रसंचलन केले. न्या. पी. एन. आवळे यांनी आभार मानले. यावेळी वकील प्रकाश गायकर, विष्णु मानकर, दीपक ताजनपुरे, योगेश सारडा, विक्रांत माने, पांडुरंग तिदमे आदींसह नाशिक व नाशिकरोड बारचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.