नाट्यगृहात विधायक कार्यक्रम व्हावेत

नाट्यगृहात विधायक कार्यक्रम व्हावेत

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

प्रत्येकानेच आपल्या जातीपुरते मर्यादित विचार न करता जाती पलीकडे जाऊन बहुजन समाजाला न्याय कसा द्यायचा हा विचार करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेच्या नाट्यगृहात कलादालनात समाज विधायक मार्गाकडे जाईल असे कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी व्यक्त केली...

सिन्नर नगर परिषदेच्यावतीने (Sinnar Municipal Council) उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक रंगमंच व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कलादालनासह शिवाजी चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा खा. संभाजीराजे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर नाट्यगृहात आयोजित पहिल्याच शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खा. हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, राजेश गडाख, नामकर्ण आवारे, शिवाजीराव देशमुख, करण गायकर, प्रशांत दिवे, संजय सानप, कचरू गंधास यांच्यासह नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवाजी महाराज केवळ मराठा समाजाचे नसून बारा बलुतेदारांचेही राजे होते. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेतृत्व करतील असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजाचा उध्दार कसा करता येईल यादृष्टीने काम केले. त्यातूनच अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे लोक निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधायक कार्यक्रम करण्याबरोबरच नाट्यगृह स्वतःच्या पायावर उभे राहील असा प्रयत्न करा.

भावना स्वच्छ असेल तर एका इमारतीचे दहा वेळा उद्घाटन झाले तरी फरक पडत नाही. विधायक कामाच्या मागे छत्रपती घराणे कायम राहते असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे छत्रपतींचे विचार सर्वत्र रुजविणे गरजेचे असल्याचे खा. गोडसे म्हणाले. नाट्यगृहामुळे सिन्नर नगरी कलानगरी म्हणूनही लवकरच उदयास येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही पाहू शकलो नाही.

मात्र त्यांचे वंशज म्हणून खा. संभाजीराजे यांच्यातच आम्ही महाराजांना पाहतो. त्यांच्या हस्ते सुशोभीकरणासह नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्याने खर्‍या अर्थाने सार्थक झाल्याची भावना राजाभाऊंनी व्यक्त केली. उदय सांगळे, करंजकर यांचीही यावेळी भाषणे झाली.

नगराध्यक्ष डगळे यांनी प्रास्ताविक केले. किरण मिठे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याधिकारी संजय केदार यांनी आभार मानले. वास्तु विशारद जितेंद्र जगताप, हर्षल काळे यांच्यासह नाट्यगृहाच्या उभारणीत योगदान देणार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हरिचंद्र लोंढे यांचा पुढाकार

शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशी दोन पिढ्यांची इच्छा होती. नव्वदच्या दशकात या पुतळ्यासाठी कृष्णाजी भगत यांच्या पुढाकारातून वर्गणी गोळा करण्यात आली. मात्र, गाव छोटा असल्याने म्हणावे अशी रक्कम उभी राहू शकली नाही.

शेवटी प्रकाशभाऊ वाजे यांनी पुढाकार घेत तत्कालीन नगराध्यक्ष हरिचंद्र लोंढे यांच्याकडे जमा झालेली सर्व रक्कम सुपूर्द केली व नगरपालिकेनेच पुतळा उभारावा अशी विनंती केली. स्व. लोंढे यांनी तत्काळ तत्कालीन सर्व नगरसेवकांना विश्वासात घेत पुतळ्यासाठी नगरपालिकेत तरतूद केली.

त्यामुळे हा पुतळा उभारण्याचे सिन्नरकरांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर पुतळ्याच्या परीसराची दुर्दशा पाहून शिवसेनेची सत्ता येताच आपण नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह सर्व नगरसेवकांना सुशोभीकरणासाठी शब्द टाकला. त्यांनी एकमताने निर्णय घेत हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे ऋण वाजे यांनी व्यक्त केले.

लोकार्पण नव्हे शुभारंभ

नाट्यगृहाचे इमारतीचे सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. मात्र नाट्यगृहात अनेक कमतरता होत्या. त्या कमी करण्यास सात वर्षे लागली व हे नाट्यगृह सर्वांना वापरण्याचा शुभारंभ होत असल्याचे राजाभाऊ म्हणाले.

सिन्नरचा दवाखाना पाडणार्‍यांनी नव्या इमारतीसाठी केवळ 1 हजारांची तरतूद केली होती. मात्र, राजाभाऊंनी आमदार बनताच त्यासाठी 8-10 कोटींचा निधी आणून दवाखान्याची देखणी इमारत त्यासाठी बांधल्याचे सर्वांनी पाहिले असल्याचे विजय करंजकर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com