मार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना

ननाशी-दिंडोरी रस्त्यावर वाहनचालकांची परवड
मार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडेना

ननाशी | प्रतिनिधी | Nanashi

ननाशी-दिंडोरी (Nanashi-Dindori) या 35 किमी रस्त्याची ठिकठिकाणी मोठया प्रमाणात दुरवस्था झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती (road repair) होणे अत्यावश्यक असून आता या रस्त्याच्या दुरवस्थेला नागरिक आणि वाहन चालक प्रचंड कंटाळले आहेत.

दिंडोरी तालुक्याचा (dindori taluka) पश्चिम भाग तालुक्याला जोडणारा ननाशी - दिंडोरी हा महत्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी एवढे खड्डे पडले आहेत की वाहन चालवताना चालकाला प्रश्न पडतो की कुठला खड्डा (potholes) टाळावा आणि त्यातून मार्ग कसा काढावा. तब्बल 35 कि. मी. चा हा रस्ता असून नित्य वर्दळीचा आहे.

परिसरातील नागरिकांना शासकीय कामासाठी, वैद्यकीय उपचारासाठी (Medical treatment) इतर तत्सम कामांसाठी दिंडोरी येथे याच रस्त्यावरून यावे लागते. शेतकर्‍यांना (farmers) आपला शेतमाल विक्रीसाठी न्यायचा झाल्यास याच रस्त्यावरून खडतर प्रवास करत न्यावा लागतो परिणामी रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे येथील प्रवास प्रचंड त्रासदायक आणि वेळखाऊ बनला आहे.

या रस्त्यावर वनारे फाटा ते चारोसे दरम्यान खडीकरण झाले असून उर्वरित काम मात्र अपूर्णच राहिले आहे. जोरण पासून निळवंडी - पाडे पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे (potholes) पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहनचालक आणि प्रवाशांचे अक्षरशः हाडे खिळखिळे होत आहेत. पण तरीही रस्त्याची दुरुस्ती काही होत नाही. रस्ता निळवंडी ते वलखेडफाटा दरम्यान काही ठिकाणी खूपच अरुंद झाला असून त्यामुळे छोटे- मोठे अपघात (accidents) होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

या मार्गावरून नित्य प्रवास करणार्‍या नागरिकांना अनेक शारीरिक व्याधीही निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नादुरुस्त आणि खड्डेमय (potholes) रस्त्यामुळे वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शारीरिक त्रास तर नित्य होत असतो पण आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.

या रस्त्याची आतापर्यंत अनेकदा दुरुस्ती करण्यात आली पण कामाच्या दर्जा अभावी ही दुरुस्ती केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरली. या रस्त्याचे संपूर्ण ननाशी - दिंडोरी असे दुरुस्तीचे काम होणे अपेक्षित असतांना हे काम मात्र तुकडे पाडून केले जाते त्यामुळे सलगपणे पूर्ण रस्ता दुरुस्ती होतच नाही. नागरिकांनी ओरड केल्यावर तेव्हढ्यापुरती दुरुस्ती केली जाते तद्नंतर आहे ती परिस्थिती कायम राहते .यात आता तरी बदल होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याचे दुरुस्तीचे (Road repair) सिमेंट काँक्रीटीकरण (Cement concretization) करण्याचे कामे लाखो करोडो रुपये खर्च करून केले जातात, मग या रस्त्याचेही एकाच वेळी उत्कृष्ट दर्जाचे काम करून ही समस्या लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) कायमस्वरूपी का सोडवली जात नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेला सतावत आहे.

या रस्त्याचे काम (road work) चांगले आणि दर्जेदार व्हावे ही या परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांची खूप जुनी आणि रास्त मागणी आहे. परंतु ही मागणी तडीस लागण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे धोरण मात्र कायन उदासीन राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण अशा नादुरुस्त रस्त्यावरून अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांना नित्य प्रवास करावा लागत नाही.

त्यामुळे सामान्य नागरिकाला नेमका काय आणि किती त्रास सहन करावा लागतो याचा अंदाज या मंडळींना येत नाही. किंबहुना विकासातील रस्ते विकास हा अविभाज्य भाग असल्याचा विसर या मंडळींना पडल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे.

ठेकेदारांवर वचकच नाही

दिंडोरी - ननाशी या रस्त्याचे आतापर्यंत अनेकदा दुरुस्तीचे काम झाले आहे पण दुरुस्ती कामाचा दर्जा नेहमीच वादातीत राहिला आहे. कामाच्या दर्जाबाबत ठेकेदारावर लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचा वचक नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील काळात या रस्त्यावरील निगडोळ ते पाडे इथपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, परंतु कामाच्या सुमार दर्जामुळे हे काम वादाच्या भोवर्‍यात सापडले होते.

ननाशी ते दिंडोरी हा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतमाल वाहतुकीसही कमालीचा विलंब होतो. शिवाय शेतमाल वाहतूक करणार्‍या वाहनांचे नित्य नुकसान होते ते वेगळे परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे त्यासाठी संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी नियंत्रण ठेवून दर्जेदार काम करून घ्यावे.

- अरुण कड, उपतालुका समन्वयक दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com