इंटरनेट नसेल तर लसीकरणासाठी जि.प शाळा वापराव्या

इंटरनेट नसेल तर लसीकरणासाठी जि.प शाळा वापराव्या

उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ : अधिकार्‍यांना सूचना

नाशिक । Nashik

लसीकरणासाठी ज्या गावांमध्ये उपकेंद्रांना इमारत निर्लेखित केलेली आहे. तसेच ज्या उपकेंद्रांना इंटरनेटची सुविधा नाही अशा गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण मोहिम सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका शिक्षण अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेंची निवड करावी, अशा सूचना करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम तथा उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी दिल्या आहेत.

लसीकरणासाठी जिल्हा परिषद शाळा निवडतांना शाळेची इमारत सुस्थितीत असावी. त्यामध्ये इंटरनेची सुविधा, सद्यस्थितीत लसीकरण मोहिम केंद्र चालू असलेल्या प्राथमिक केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या शाळेची निवड करण्यात यावी. तसेच लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेअंतर्गत मोठी लोकसंख्या उपलब्ध असलेल्या शाळेची निवड करण्यात यावी. मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणासाठी शाळा निवडतांना पुरेशा जागेची उपलब्धता, प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्षाचे नियोजन करण्यात यावे.

लसीकरणाचे असे करावे नियोजन

लसीकरण मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे दिवस आवश्यकतेनुसार ठरवावे. लसीकरण सत्राच्या दिवशी वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ कोवीड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात उपलब्ध राहणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी गावनिहाय व दिवसनिहाय कृती आराखडा तयार करण्यात यावा.

लसीकरण टिम मध्ये लसीकरण अधिकारी (1), लसीकरण अधिकारी (2), लस टोचक अधिकारी , लसीकरण अधिकारी (4), लसीकरण अधिकारी (5) या पाच व्यक्ती कार्यरत असाव्यात.लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना बोलविण्याकरता आशा,अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व इतर सपोर्ट स्टाफ ची मदत घेण्यात यावी.

संबधित लसीकरण अधिकाऱ्यांमार्फत लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. परंतु ग्रामीण भागात शेतीची कामे व बराचसा मजूर वर्ग असल्याने आवश्यकता असल्यास लसीकरणाची वेळ लाभार्थ्यांच्या कामानुसार सोयीनुसार ठेवण्यात यावी . तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असेल याची खात्री देखील संबंधित अधिकाऱ्यांनी करावी.लसीकरण केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व ‘को विन 2 ॲप’ वापरण्याबाबत व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात यावे.

लसीकरणाच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून लसीचा पुरवठा त्यांच्या मागणीनुसार करण्यात यावा. कोवीड 19प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र दर्शविणारे गाव निहाय फलक आणि व्हाट्सअप माध्यमातून जवळील उपकेंद्र स्तरावर प्रचार-प्रसार करण्यात यावा.

लसीकरण केल्यानंतरच्या 30 मिनिटाचा आत व त्यानंतर होणाऱ्या सर्व सौम्य, गंभीर ,अतिगंभीर लाभार्थ्यांची माहिती नोंदणी व तपासणी ‘को-विन’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात यावी तसेच केंद्र स्तरावरील नोंदवही मध्ये नोंद घेण्यात यावी, असे मिसाळ यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com