
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरातील रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. नाशिक शहरात पाऊस कमी पडला असतानाही रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मुसळधार पावसाने मनपाचे वाभाडे बाहेर निघण्याची शक्यता संभवते आहे. मागील वर्षाचा अनुभव घेऊन यंदा मनपाने जय्यत तयारी करणे अपेक्षित होते. मात्र, डागडुजीतून केवळ मलमपट्टी केल्याने पहिल्या पावसाच्या भुरभुरीतच रस्ते खड्डेमय झालेले आहेत.
आ.राहुल ढिकले यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर दाद मागत पेठरोडच्या उभारणीला निधी मागितला होता, तर शहराच्या बाह्य रिंगरोडची निर्मिती करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आलेली होती. या निमित्ताने शहरातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर असलेल्या खड्डे महापालिकेने बुजविले होते, मात्र पहिल्या पावसातच ते उखडल्याच दिसून आले. हे खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. काही ठिकाणी महापालिकेने डांबर टाकून खड्डे बुजवले होते त्या ठिकाणी डांबर उखडून पुन्हा खड्डे पडले आहे, त्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे ते खड्डे वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.रात्रीच्या वेळी तर या पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून वाहने जाण्याने अनेक वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लालेले आहे.
नाशिकरोड परिसरात प्रामुख्याने दत्तमंदिर रोड शिवाजी पुतळा चौक परिसर बिटको चौक दत्तमंदिर चौक आशानगर कॉलनी विहितगाव परिसर महात्मा गांधीरोड टिळकपथ, शाहूपथ, बिटको चौकातील सिग्नलजवळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून सिन्नर फाटाकडे जाणार्या उड्डाण पुलावर, महात्मा गांधी पुतळा चौक ते बिटको दरम्यान जाणार्या रस्त्यावर बाजूने खोदून ठेवलेले आहे.शालिमार हॉटेल जवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा अजूनही बुजवलेल्या नाही.
सातपूर भागात अशोकनगर परिसरातील अवजड वाहनाच्या वाहतुकीने रस्ते लवकर उखडत आहेत,या ठिकाणी स्टेट बँकेच्या विरुध्द बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे होत आहेत. महात्मानगर परिसरातील एबीबी सिग्नल, सिबल हॉटेल, दूध डेअरी या भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सिबल हॉटेलच्या मागे ब्राह्मण महासंघ सभागृहासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
पश्चिम नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था पहायला मिळत आहे. या परिसरात राजीव गांधी सिग्नल, पोलिस पेट्रोल पंपासमोर तसेच महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. हा भाग वर्दळीचा असल्याने वाहन चालकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. नवश्या गणपती मंदिर परिसरात तलावच साचत आहे. त्यातून खड्डे चुकवणे कठीण होत आहे. पंचवटी परिसरातील हरसूल पेट्रोलपंप, तपोवन चौफूली, भारतनगर, मुंबई नाका, रसोई हॉटेल समोर, द्वारका सिग्नल, निमाणी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. त्यातून मार्ग काढणे प्रवाशांसह वाहन चालकांसाठी दिव्य ठरत आहे.
जुने नाशिक परिसरात अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमारात वाताहत झालेली आहे. त्यात मुख्य रस्त्यांवरही खड्डे दिसून येत आहेत. मुंबई नाका परिसरातील भारत नगर चौफुली, छान हॉटेल चौफुली, भाभानगर मुंबई नाका परिसर, पंचशीलनगर गंजमाळ, शालिमार सिग्नल, शालिमार चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.