घरकाम मोलकरणींच्या कामाला लागणार शिस्त

घरकाम मोलकरणींच्या कामाला लागणार शिस्त

सारिका पूरकर-गुजराथी

नाशिक | Nashik

घरकाम मोलकरणींच्या कामाच्या दर्जाबाबत आजही अनेक तक्रारी समोर येतात. या मोलकरणींच्या कार्यपद्धतीत, त्यांच्या कामात सुधारणा होणे गरजेचे आहे. मुंबई-पुण्यात अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने या मोलकरणी काम करतात. नाशकात अजूनही त्या धर्तीवर या महिला काम करत नाहीत. नाशकात हे प्रोफेशनल कल्चर रुळावे, घरेलू मोलकरणींच्या कामाला शिस्त लागावी म्हणून कामगार संघटनांनी मात्र काही सकारात्मक पाऊले उचलली आहेत.

१२० महिलांना यशस्वी प्रशिक्षण

घरेलु मोलकरीण या सहसा समाजातील अत्यंत हलाखीच्या किंवा मध्यम आर्थिक कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या असतात. त्यांचे शिक्षण कमी असते किंवा काही वेळेस नसतेच. त्यामुळेच आपल्या कामात नेमकेपणा कसा आणता येईल? याबाबत त्या अनभिज्ञ असतात. म्हणूनच त्यांच्या कामाबाबत विशेषत: नाशिकसारख्या शहरात आजही असंख्य तक्रारी असतात.

मात्र याच मोलकरणींना घरकामाचे योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यपद्धती ग्राहकाभिुमख तसेच प्रोफेशनल, स्मार्ट कशी करता येईल यासाठी घरकाम मोलकरीण संघटनेने मुक्त विद्यापीठाच्या सहाय्याने अभ्यासक्रम विकसित केला. या अभ्यासक्रमाच्या दोन बॅचेसही उत्तीर्ण झाल्या. १२० महिलांना या अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

औरंगाबाद, नागपूर येथील महिलांचाही यात समावेश होता. ६ विषयांची सहा पुस्तके त्यासाठी मुक्त विद्यापीठाने विकसित केली आहेत. दर रविवारी तीन तास याप्रमाणे या महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचा आहार, महिलांचे आरोग्य, महिलाविषयक कायदे, घरकामात वापरण्यात येणारी विविध उपकरणे कशी वापरावीत? सहजसोपे इंग्रजी कसे बोलावे ? अशा विविध विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश होता.

या महिलांना संवादात्मक पद्धतीने या विषयांची माहिती देण्यात आली. तसेच लेखी व तोंडी अशी दोनही पद्धतीने परीक्षाही घेण्यात आली. काही विषयांचे प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आली. कॉ.राजू देसले व रुपाताई कुलकर्णी यांच्या भरीव योगदानातून हा अभ्यासक्रम यशस्वीही झाला.

या आढळतात तक्रारी

दरम्यान, इतर खासगी आस्थापनांमध्ये नोकरदारांना सुटट्यांची संख्या ठरवून दिलेली असते. या मोलकरीण कामगारांना मात्र तसे कुठलेच बंधन आजही ठरवून देण्यात आलेले नाही. या मोेलकरीण त्यांच्या सोयीच्या दृष्टीनेच केव्हाही सुटीवर किंवा वारंवार सुटीवर जातात ही तक्रार मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच कामात स्वच्छता नसणे, कामाच्या वेळा न पाळणे, सुुटी घेताना संबंधितांना माहिती न देणे या तक्रारींची संख्याही मोठी आढळते. तसेच नोकरदार महिलांना आपली गरज आहे, आपल्याला कामांची कमी नाही हा एक आर्विभाव देखील या पाहायला मिळतो.

नैतिक जबाबदारीचे भान देण्यासाठीही प्रयत्न

घरकाम मोलकरीण कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कामगार संघटना नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र त्यांना त्यांच्या जबाबदारीची, त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठीही आता संघटनांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या मोलकरणींच्या सभा घेऊन त्यांना कामाप्रती अधिक जागरुक राहण्यासंदर्भात वेळोवेळी जाणीव करुन दिली जात आहे. मुंबईत २७००० महिला घरकाम कामगार संघटनेत सहभागी आहेत. तेथे दर महिन्याला या कामगारांच्या सभा होतात. तेथे त्यांना नियमित मार्गदर्शन केले जाते.

नाशिकमध्ये एवढ्या नियमित सभा होत नाहीत. परंतु, नाशकात जवळपास ८७५२ घरेलु मोलकरीण कामगार संघटनेशी बांधिल आहेत. त्या सर्वांनाच कामाच्या ठिकाणी जबाबदरीपूर्वक सेवा देणे, आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहणे याविषयी वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. नोकरदार महिला मदतीसाठी या महिलांना कामावर ठेवतात. त्यामुळे नोकरदार महिलांचे काम, त्यांचे वेळापत्रक याचे नुकसान होणार नाही यांदृष्टीने सुट्ट्यांचे नियोजन करणे, सणांच्या सुटट्या, आजारपणातील सुट्ट्या यांची विभागणी करणे यासंदर्भातही ठोस नियोजनावर भर भविष्यात देण्यात येणार आहे.

घरकाम मोलकरीण कामगार भगिनींच्या न्याय हक्कासाठी लढत असतानाच त्यांच्या कार्यशैलीत सुधारणा करण्यासाठीही नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटना प्रयत्न करतेय.मुक्त दरम्यान, संघटनेतफे या महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठीही हरएक प्रयत्न होत आहेत. सामाजिक संस्था, सुजाण नागरिक देखील सहकार्य करीत आहेत. मात्र शासन दरबारी आमच्या पदरी निराशा पडत आहे. २०११ मध्ये यासंदर्भात कायदा झाला. ना.फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील सरकारने मात्र घरेलू कामगार योजनाच रद्द केली. महाविकास आघाडी सरकारनेही २५ कोटी मंजूर केले. प्रती कामगार १५०० रुपये आर्थिक मदत मंजूर झाली. मात्र कामगारांची नोंदणी होऊनही त्यांना आर्थिक मदत मिळालीच नाही. विद्यमान सरकारनेे किमान १०० कोटींची आर्थिक तरतूद करुन या महिलांचे भविष्य सुरक्षित करावे, हीच संघटनेची मागणी आहे.

-कॉ.राजू देसले - कार्याध्यक्ष, आयटक

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com