गुरुजी रूग्णालयातून रेमडीसीविर इंजेक्शनची चोरी

याप्रकरणी दोन वार्डबॉय व एका मदतनीसास अटक
गुरुजी रूग्णालयातून रेमडीसीविर इंजेक्शनची चोरी

नाशिक । Nashik

रेमडीसीविर इंजक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून याचा काळाबाजर वाढला आहे. काळ्याबाजारात विकण्यासाठी रुग्णालयातून २ रेमडीसीविर इंजेक्शन चोरल्याची घटना गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात घडली.

याप्रकरणीगंगापूर पोलिसांनी तपास करून तासाभरात तिघांना अटक केली आहे. यामध्ये दोन वार्डबॉय व एका मदतनीसाचा सामावेश आहे.त्यांच्याकडून १० हजार ८०० रुपयांचे दोन इंजेक्शन जप्त केले. वॉर्डबॉय विकी वरखडे, वॉर्डबॉय गणेश गंगाधर बत्तीसे व शस्त्रक्रिया विभागातील मदतनीस सागर सुनिल मुटेकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सहायक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार , श्री गुरुजी रुग्णालयातील प्रशासन अधिकारी पूनम हर्षल बेलगावकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रुग्णालयातील नर्सिंग कौंटरवरून रविवारी सकाळी दहाच्या सुमारास चोरट्याने दोन इंजेक्शन चोरल्याचे सांगितले. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.

सीसीटिव्हीच्या पाहणीत चोरट्याने पीपीई किट घालून दोन इंजेक्शन चोरल्याचे दिसून आले. चोरट्याच्या चालण्याच्या चालीवरून पोलिसांनी संशयित विकीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सागर, गणेश यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १० हजार ८०० रुपयांचे दोन इंजेक्शन जप्त केले. चोरलेले इंजेक्शन विक्री करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीसह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com