बटुक हनुमान मंदिरातील दागिन्यांची चोरी

 बटुक हनुमान मंदिरातील दागिन्यांची चोरी

पंचवटी । वार्ताहर Nashik / Panchavati

तपोवनात ( Tapovan ) असलेल्या प्राचीन बटुक हनुमान मंदिरात ( Batuk Hanuman Temple ) शुक्रवारी (दि.९) दुपारच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना (Theft Case ) घडली. देव्हाऱ्यात असलेल्या सोन्या, चांदीच्या वस्तूंची अज्ञात व्यक्तीने चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मंदिराचे महंत बालकदास महाराज यांनी आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station ) तक्रार दाखल केली असून आडगाव पोलीस तपास करीत आहेत.

तपोवनात प्राचीन बटुक हनुमान मंदिर आहे. मंदिराचे महंत बालकदास महाराज शुक्रवारी (दि.९) दुपारी नेहमीप्रमाणे वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या खोलीत गेले. अडीच वाजेच्या सुमारास बालकदास यांना जाग आली. या सुमारास एक संशयित महिला मंदिरातून बाहेर जाताना दिसली. यानंतर बालकदास मंदिरात देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिर गाभाऱ्यात गेले असता, बालाजीचे पान असलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, साडेचारशे ग्रॅम वजनाचे चांदीचे सिंहासन असे सुमारे २५ हजार रुपये किमतीचे देवाचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे बालकदास यांना लक्षात आले.

यानंतर बालकदास महाराज यांनी आडगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. याप्रकरणी बालकदास यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

तपोवनात बटुक हनुमान मंदिर जवळील परिसर मोकळा व एकांत आहे. याआधी याठिकाणी जवळच असलेल्या एका प्राचीन वडाच्या झाडाखाली एका वृद्धाचा खून झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर गांजा देखील पकडण्यात आला होता. यासह काही महिन्यांपूर्वी एक युवकाचे अपहरण करून याच बटुक हनुमान मंदिर जवळील निर्जनस्थळी लूटमार केल्याची घटना घडली होती. यामुळे या परिसरात पोलिसांनी दिवसरात्र गस्त घालण्याची मागणी साधू, महंत यांच्यासह नागरिक करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com