नाशिक । Nashik

नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलीसांचे मुख्यालय असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) कार्यालयात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

यापुर्वीही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयांमध्ये चोर्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या अधिकार्यांची कार्यालये सुरक्षित नसतील तर नागरीक किती सुरक्षीत असतील अशी चर्चा यामुळे जिल्हाभरात होत आहे.

आयजी कार्यालयातील वातानुकूलीत यंत्रणेचे तांब्याचे पाइप आणि वायर चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस हवालदार अर्जुन खेलुकर (रा. नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे.

मीटिंग हॉलच्या वातानुकूलीत यंत्रणेच्या तांब्याचे पाइप आणि वायर असा सुमारे 31 हजाराच्या सरकारी मालमत्तेवर चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष म्हणजे हा मुद्देमाल कापून नेला असून, ही घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली.

गडकरी चौक येथे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे निवासस्थान आणि दुमजली कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारातच पाठीमागे नव्याने मीटिंग हॉल तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी परिक्षेत्रातील पोलिस अधिकार्यांच्या महत्वाच्या बैठका पोलीसांच्या अंतर्गत परीक्षा, पत्रकार परिषदा व इतर बैठका पार पडतात.

हे सभागृह मोठे असल्याने त्यास चार वातानुकूलीत यंत्र लावण्यात आली आहेत. पाच जिल्ह्यांची व्याप्ती असलेल्या या कार्यालयात दिवसरात्र पोलिसांचा बंदोबस्त असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार बी. के. चतुर करीत आहेत.