नाशकात दोन ठिकाणी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

नाशकात दोन ठिकाणी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत असलेल्या देवळाली गाव व रोकडोबावाडी परिसरात झालेल्या दोन चोऱ्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेचार लाखांच्या रोख रकमेसह ऐवज चोरुन (Theft) नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत राहुल दिनकर (रा. रोकडोबा वाडी देवळाली गाव) यांनी फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, रोकडोबा वाडी येथे राहणाऱ्या त्यांच्या मावशीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरात असलेले दीड लाख रुपये रोख, पंचेचाळीस हजार रुपयांचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, वीस हजार रुपयांचे दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा कोल्हापुरी हार, वीस हजार रुपयांचा लक्ष्मी हार,

40 हजार रुपयांचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, वीस हजार रुपयांचा सोन्याचा हार, दहा हजार रुपयांचे कानातले वेल, 10 हजार रुपयांचे कानातले झुबे असा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत राहुल दिनकर यांनी शेजारी राहणाऱ्या दोन व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास लोंढे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत देवळाली गाव येथील धनगर गल्लीत असलेल्या सिद्धिविनायक किराणा दुकानाचे शटर कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडले. दुकानातील 45 हजार 240 रुपये रोख व तीन हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेट, असा सुमारे 48 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सुमित कुलकर्णी (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, म्हसोबा मंदिर मागे महाराजा बस स्टॉप, लॅम रोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com