
पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant
सुरत-शिर्डी महामार्गावर येणार्या निफाड (कुंदेवाडी) येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम कित्येक वर्षांपासून सुरू असून ते काम सध्या अर्धवट अवस्थेत पडून आहे. याउलट खेरवाडी रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम कुंदेवाडी उड्डाणपुलानंतर सुरू झाले आणि लवकरच पूर्ण होत आहे. तर कमी अंतराचा आणि बारा वर्षांनंतरही अपूर्णावस्थेतील पूल म्हणून या उड्डाणपुलाची नोंद होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांतच ओझर-चांदोरीमार्गावरील खेरवाडी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी वाहनांना खुला करण्यात येणार आहे. असे असताना निफाड (कुंदेवाडी) येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम तितक्याच वेगाने पूर्ण होण्याकामी महामार्ग व रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिर्डी-सुरत महामार्ग हा कुंदेवाडी रेल्वे क्रॉसिंग करून जातो. या महामार्गावर दिवसभरात हजारो मालवाहू व प्रवासी वाहनांची ये-जा सुरू असते. त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी येथील कांदा व्यापारी कांदा निर्यातीसाठी कुंदेवाडी आणि खेरवाडी (नारायणगाव) या दोन्ही रेल्वेस्टेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्टेशनवर जाणारे रेल्वे उड्डाणपूल हे तत्परतेने पूर्ण होणे गरजेचे आहे.
तालुक्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ओझर-चांदोरी जिल्हा मार्गावर खेरवाडी (नारायणगाव) येथे सध्या मध्य रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस दररोज दोन तास मेगाब्लॉक घेत उड्डाणपुलावरील रेल्वेमार्गाच्या हद्दीतील मुख्य गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले असून उड्डाणपुलाच्या उभारणीमधील हा मुख्य टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच कुंदेवाडी येथील रेल्वेमार्गाच्या हद्दीतील मुख्य गर्डर टाकण्याचे काम काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु दोन्ही बाजूंचे काम अद्याप अपूर्ण आहे.
येवला, नगर, संभाजीनगर, शिर्डी, सिन्नरकरांना फायदा
ओझर-चांदोरी-सायखेडा हा रस्ता पुढे सिन्नर-शिर्डीला जोडला जात असल्याने या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. गोदाकाठसह सिन्नर परिसरातील शेतकर्यांना ओझर-पिंपळगाव बाजारपेठेत शेतमाल नेण्यासाठी हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. गुजरातहून पेठ, सुरगाण्याचे हजारो भाविक शिर्डीला जाण्यासाठी याच दोन्ही रस्त्यांचा वापर करतात. उड्डाणपुलामुळे वाहनचालकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. शेतकर्यांचा शेतमाल बाजारपेठेत तत्काळ पोहोचणार असून इंधन बचत होणार आहे. त्यामुळे रस्ते प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या कामासंदर्भात लक्ष घातले पाहिजे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. यासंदर्भात जनतेला उत्तरे द्यायची आहेत, हे लोकप्रतिनिधींनी विसरू नये, अशी भावना निफाड तालुक्यातून व्यक्त होत आहे.
कुंदेवाडी रेल्वे पुलाचे काम रेल्वे क्रॉसिंगवर पूर्ण होऊन दीड-दोन वर्षे उलटून गेली तरीही दोन्ही बाजूकडील रस्ता जोडणीचे काम कित्येक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे पुलाचे काम जरी झाले तरी फाटकाचा अडथळा अजून संपलेला नाही. सुरत, शिर्डी, नगर, छत्रपती संभाजीनगर येथील व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, भाविक आणि विद्यार्थ्यांना फाटक बंदचा फटका बसतो.
सुधाकर कापडी, उद्योजक, पिंपळगाव
वाहतुकीचा प्रश्न कायम
कुंदेवाडी येथील रेल्वेचा उड्डाणपूल म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता अद्याप जोडलेला नाही. फाटकाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खूप खराब झाला आहे. त्यामुळे भरतीच्या मालवाहू गाड्यांचे पाटे तुटण्याचे प्रसंग अनेकवेळा आले. अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात यावा.
शिवाजी ढेपले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा भ. विमुक्त राष्ट्र, काँग्रेस सेल
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
निफाडच्या पश्चिम भागातील 40-50 गावांतील नागरिकांना शासकीय कामकाजानिमित्त निफाड येथे जावे-यावे लागते. त्यामुळे बराच वेळा रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक बंद असल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. लोकप्रतिनिधींनी या कामात लक्ष घालणे गरजेचे आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत
नागरिकांची गैरसोय दूर करावी
कुंदेवाडी येथून रेल्वेने मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जातो. जेव्हा कांदा पाठवण्यासाठी रेल्वेचे रॅक लागतात त्यावेळेला बर्याचदा रेल्वे फाटकचा प्रश्न निर्माण होऊन वाहतुकीमध्ये अडथळा येतो. म्हणून रेल्वे पुलाचे काम शासनाने पूर्ण करून सामान्यांची गैरसोय दूर करावी.
सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असो.