नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

नांदूरशिंगोटे | प्रतिनिधी | Nandurshingote

नांदुरशिंगोटे ग्रामपंचायत (Nandurshingote Gram Panchayat) प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांचा रोष अनावर होऊन ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला...

स्वच्छ भारत अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission) 2012 सालच्या यादीतील ठराविक चुकांमुळे ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला. ग्रामपंचायतच्या यादीमध्ये काही लोक भूमिहीन तर काही लोक स्थलांतरित दाखवण्यात आले आहेत.

या यादीमध्ये चक्क परिसरातील सात लोक जिवंत असताना ते मृत दाखविण्यात आले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तशी यादी ग्रामस्थांच्या हाती पडल्यानंतर ग्रामस्थांनी याचा जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेत ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन देऊन यादी बाबत विचारणा केली.

कुणाचेही चुकीचे काम आम्ही केलेले नाही व सदरच्या याद्या वरिष्ठ पातळीवर पाठवलेल्या नसून त्या दुरुस्त करून पाठपुरावा करु व कुणीही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन सरपंच, ग्रामसेवकांनी दिले. मात्र, त्यातून ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.

गावातील सात लोक जिवंत असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या अजब कारभाराने ते मृत दाखविलेले असून त्या लोकांनी आम्हाला मृत्यूचे दाखले मिळावे अन्यथा आम्ही येथेच आत्महत्या करू असा इशारा दिला.

अखेर ग्रामस्थांनी ग्रामसेवकास कार्यालयाबाहेर येण्यास सांगून कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके, राजेंद्र दराडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वरिष्ठ पातळीपर्यंत याबाबत पाठपुरावा करु व संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चुकीच्या पद्धतीने याद्या प्रसिद्ध

ग्रामपंचायतने खोटी ग्रामसभा दाखवून त्या ग्रामसभेचा ठराव जोडून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या याद्या चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्या असल्याचा आरोप व त्यामुळे त्या याद्यांमध्ये मयत दाखविण्यात आलेल्या ग्रामस्थांचा रोष या गोष्टींमुळे आम्ही ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले

- राजेंद्र दराडे, संघर्ष ग्रुप, नांदूरशिंगोटे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com