धरणांच्या जलसमृद्धीने टंचाईचे ग्रहण सुटले

धरणांच्या जलसमृद्धीने टंचाईचे ग्रहण सुटले

मालेगाव । हेमंत शुक्ला Malegaon

कसमादे परिसरासाठी वरदान ठरलेले चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद व विशालकाय गिरणा धरणांच्या पाणीसाठ्याने सलग तिसर्‍या वर्षी शंभरी गाठली आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट यावर्षीदेखील भेडसावणार नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तुडुंब भरलेल्या या धरणांमुळे पिण्यासह शेती सिंचनाचा पाणीप्रश्न निश्चित निकाली निघाला आहे. धरणे तर भरलीच परंतु गाव शिवारातील लहान-मोठे तलाव तसेच विहिरीदेखील तुडुंब भरून वाहू लागले होते. धो-धो पडत असलेल्या संततधारेमुळे यावर्षीदेखील वरुणराजास आता थांब, विश्रांती घे, असे साकडे घालण्याची वेळ आली होती.

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणे तर तुडुंब भरलीच परंतु दुथडी वाहत असलेल्या गिरणा, मोसम व आरम नद्यांमुळे मालेगाव मनपासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. करोना संकटामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. परंतु निसर्ग कृपेमुळे यंदादेखील किमान पाणीटंचाईचे संकट भेडसावणार नसल्याने कसमादेनावासियांना मनमाड शहराचा अपवाद वगळता मोठा दिलासा मिळाला आहे.

धरणांची मांदियाळी तरी पाण्यासाठी भटकंती अशी परिस्थिती मालेगावसह सटाणा, देवळा, नांदगाव तालुक्याच्या जणू पाचवीलाच पुजलेली म्हणावी लागेल. पूर्वी सरासरी ओलांडणार्‍या पर्जन्यमानामुळे कसामादेना परिसर हिरवळीने नटलेला होता. नदी-नाले बाराही महिने प्रवाहित राहत असल्यामुळे हा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला होता. दृष्टी पडावी तेथे शेतात ऊस डौलाने उभा असल्याचे दिसत होते. गिरणा-मोसम नदीकाठावरील गावे तर या मुबलक पाण्यामुळे ‘बागायत’दार ठरली होती. ही ओळख पाणी चार महिने असले तरी अद्याप टिकून आहे हे विशेष.

उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे गिरणा, रावळगाव, वसंतदादा व नंतर द्वारकाधीश असे एक-दोन नव्हे तर तब्बल चार साखर कारखाने येथे पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम पूर्ण करत होते. या चारही कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असल्याने कसमादे भागातील शेकडो कामगारांच्या घरातील चुलीही पेटत होत्या. रोजगार निर्मितीचे हे साखर कारखाने त्याकाळी केंद्रबिंदू ठरले होते. पाण्याच्या मुबलकतेमुळेच कसमादे भाग संपन्न बनला होता.

मात्र हिरवाईने नटलेल्या या भागास कुणाची तरी दृष्ट लागावी तसे पावसाच्या पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होत गेल्याने अवर्षणग्रस्त तालुके दुष्काळी म्हणून नावारूपास येऊ लागले. पाणीटंचाईचा मोठा फटका शेती सिंचनास बसला. पिण्यासाठी धरणांचे पाणी आरक्षित होऊ लागल्याने सिंचनाचे आवर्तन कमी झाले. त्यामुळे परिसरातील ऊस शेती 50 ते 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊन डाळिंब, द्राक्ष, पेरू, आवळा या फळबागांसह कांद्याकडे परिसरातील शेतकरी वळले.

सहकार क्षेत्रातील अनागोंदीने गिरणा, वसाका तर उसाअभावी रावळगाव कारखाना बंद पडला. मात्र बागलाणातील द्वारकाधीश आजही सुरळीतरीत्या सुरू आहे. कालांतराने गिरणा, वसाका व रावळगाव खासगी कंपन्यांनी चालवण्यास घेतले असले तरी या कारखान्यामुळे परिसराला लाभ किती? हा संशोधनाचा विषय ठरावा.

चांगला पाऊस, तुडुंब भरलेली धरणे, तलाव या भागातील जनतेसह शेतकर्‍यांची चिंता दूर करणारे ठरतात. त्यामुळे चणकापूर, हरणबारी व केळझरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे का? याची पृच्छा मालेगाव, बागलाण नव्हे तर नांदगाव, चाळीसगाव व जळगाव जिल्ह्यातील नागरिकदेखील सातत्याने पावसाळा प्रारंभ होताच करत असतात.

या चौकशीमागचे कारण म्हणजे पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास चणकापूर, केळझर व हरणबारी धरण तुडुंब भरल्यावरच गिरणा, मोसम व आरम नद्या प्रवाहित होऊ शकणार आहेत. गिरणा, मोसम दुथडी वाहिल्यानंतरच हे पूरपाणी गिरणा धरणात पोहोचून मालेगाव, नांदगावसह चाळीसगाव, जळगाव जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकणार असल्याने पाणलोट क्षेत्राच्या पावसाची चिंता येथील नागरिकांतर्फे केली जाते.

यंदा जून-जुलै महिन्यात पावसाने डोळे वटारल्याने चिंतेचे ढग दाटले होते. मात्र ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उघडीप घेत झालेल्या जोरदार पावसामुळे हरणबारीपाठोपाठ चणकापूर, केळझर, पुनद व सर्वात शेवटी गिरणा धरणदेखील तुडुंब भरले. पावसाच्या संततधारेमुळे गिरणा, मोसम या नद्या यंदा प्रथमच दीर्घकाळ प्रवाहित राहिल्या. त्यामुळे काठावरील सर्व पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई पूर्णत: संपुष्टात आली आहे.

जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात मोठे असलेल्या विशालकाय गिरणा धरणाने सलग तिसर्‍या वर्षीदेखील शंभरी गाठली आहे.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरअखेरीस गिरणा तुडुंब भरल्याने सहा दरवाजे उघडण्यात येऊन हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. आजमितीस गिरणा धरणाचा विसर्ग थांबला असला तरी शनिवारी (दि. 30) चणकापूरमधून 50, हरणबारीतून 28 व नाग्यासाक्या धरणातून 56 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आला होता. धरणांनी गाठलेल्या शंभरीमुळे जनतेची पिण्याच्या पाण्याची तर शेतकर्‍यांची सिंचनाची चिंता मिटणार आहे. अखेरच्या टप्प्यात झालेल्या व परतीच्या पावसाने तलाव, विहिरी भरून निघाल्या आहेत. यामुळे रब्बी हंगामात पाण्याची कमतरता भासणार नाही.

धरणातील पाणीसाठा

गिरणा-18,500 द.ल.घ. फूट- 100 टक्के

चणकापूर-2427 द.ल.घ. फूट- 100 टक्के

हरणबारी- 1166 द.ल.घ.फूट- 100 टक्के

केळझर-568 द.ल.घ.फूट- 99 टक्के

पुनद -1306 द.ल.घ.फूट- 100 टक्के

दुष्काळ’ तर जणू पाचवीलाच पुजलेला

यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची कमतरता भासणार नसली तरी बी-बियाणे, शेती मशागत, खते, औषधे आदींची जुळवाजुळव बिघडलेल्या अर्थचक्रामुळे करायची कशी? अशा चिंतेत कसमादेना भागातील शेतकरी सापडले आहेत. पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ व खूप पडला तर ओला दुष्काळास सामोरे जावे लागते. दुष्काळ हा जणू आमच्या पाचवीलाच पुजला आहे असे वाटायला लागले असल्याची खंत मोसम खोर्‍यातील अंबासन येथील जिभाऊ विठ्ठल भामरे यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com