बाणगंगेच्या पाण्यामुळे पाणीप्रश्न मिटला

बाणगंगेच्या पाण्यामुळे पाणीप्रश्न मिटला

कसबे सुकेणे। वार्ताहर

ऐन उन्हाळ्यामध्ये बाणगंगा नदीला आ. दिलीप बनकर यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांनी गंगापूर कालव्याचे पाणी नदीपात्रात सोडल्याने बाणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे कसबे सुकेणे उपसरपंच धनराज भंडारे यांनी म्हटले आहे.

यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली होती. बाणगंगा नदीकाठच्या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला होता. मात्र गंगापूर कालव्याला पाणी सोडण्यात आल्यानंतर आ. बनकर यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून ओझरजवळ कालव्याचे पाणी नदीपात्रात सोडल्याने ओझरपासून ते कसबे सुकेणेपर्यंत बाणगंगा नदीवरील सर्व बंधारे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

मागील वर्षी जि. प. सदस्य दीपक शिरसाठ यांच्या प्रयत्नाने बंधार्‍यांची दुरुस्ती करण्यात आली होती. तर येथील कुबेर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने मागील वर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीपात्रातील पाणी साठवण क्षमता वाढवण्यास मदत केली होती. साहजिकच आता आ. बनकर यांच्या प्रयत्नातून बाणगंगेला पाणी सोडण्यात आल्याने कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या गावांच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली होती.

आता बाणगंगा नदीला उन्हाळ्यात पाणी आल्याने बाणगंगा नदीकाठावरील दिक्षी, शिलेदारवाडी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे या गावांचा तूर्त तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नदीकाठावरील आठही गावांच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आ. बनकर यांचे आभार मानले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com