नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोर्यात वळविण्यात यावे.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणार्या कामासंबंधातील मूलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतूने आयोजित जलसंपदा विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात बैठक पार पडली.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष 0बाळासाहेब क्षीरसागर, आ. माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव एन.व्ही. शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, (अहमदनगर) अधीक्षक अभियंता आमले, (धुळे) ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वळण बंधार्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी खोर्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यासाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल. आमदारांच्या मतदारसंघातील चार्यांची कामे तसेच कॅनॉलच्या देखभाल व दुरूस्तीची कामे त्यांच्यासोबत बसून चर्चेतून अधिकार्यांनी पूर्ण करावेत त्यासाठी 10 टक्के निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे सांगून पुढील काही दिवसात दिंडोरी व कळवण मतदार संघातील प्रकल्पांच्या कामासाठी प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे : भुजबळ

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहान भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे, त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.