
लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
लासलगाव, विंचूरसह सोळा गाव देखभाल समितीच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी लासलगाव ग्रामपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. दोन महिन्यांत पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या आश्वासनानंतर तिसर्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.
लासलगाव, विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र दिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याप्रश्नी नाशिक येथे मंगळवारी (दि.2) सायंकाळी तातडीची बैठक घेऊन त्यादरम्यान तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क करून चर्चा केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी या प्रश्नासंदर्भात चर्चा करून सविस्तर अहवाल व पूर्ण योजनेबाबत माहिती घेऊन दोन महिन्यांत योजना सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे बुधवारी (दि.3) डॉ. पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ. उन्मेष काळे व नाशिक जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रताप पाटील, शाखा उपअभियंता ए.वाय. निकम, सहाय्यक अभियंता अशोक बिन्नर यांनी सकाळी 11 वाजता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. सदर योजनेच्या कामाची 6 एप्रिल 2024 पर्यंत मुदत आहे. त्या कामापैकी अर्धवाहिनी सहा किलोमीटरपर्यंत बदलणे व जलशुद्धीकरण दुरुस्तीची कामे जुलै 2023 पर्यंत दोन महिन्यांत विनाअडथळा पूर्ण करून नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करून देण्याची व उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करणे, थकबाकीच्या नावाखाली तोडलेले नळ कनेक्शन तत्काळ जोडण्याच्या सूचना दिल्या.
तसे लेखी पत्र तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांना सुपूर्द केल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती डॉ. पवार यांनी केल्यानंतर प्रकाश पाटील यांनी कन्या नित्या हिच्या हस्ते लिंबू-पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. यावेळी महिला अधिकार्यांविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मंडळ अधिकारी डी. एस. देवकाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक प्रवीण कदम, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, अमृता पवार, गणेश डोमाडे, छबूराव जाधव यांच्यासह लासलगाव, पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर, कोटमगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.