'दारणा'तील पाण्याचा वापर करा जपून!

'दारणा'तील पाण्याचा वापर करा जपून!

देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर) :

दारणा धरणातून नाशिकरोड ते लहवित दरम्यानच्या विविध आस्थापनांसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे. पुढील आवर्तन सोडण्या पर्यंत आहे. त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन विविध संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

चालू वर्षी दुष्काळाची समस्या अधिक तीव्रतेने जाणवत आहे. लष्करी व देवळालीच्या पन्नास हजार लोकसंख्येसाठी आवश्यक असलेला पाणीसाठा जरी दारणा शिल्लक असला तरी त्याचा वापर अतिशय योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे, पाणी आरक्षित असल्याने ते संबंधीतांना मिळणारच आहे.

परंतु इतर भागाला पाणी सोडताना त्याचे होणारे बाष्पीभवन तसेच दारणा नदीपात्रात ठिकठिकाणच्या गावातील शेतकर्‍यांकडून मोटारीद्वारे उपसा होणारे पाणी, याचा विचार करता देवळाली व लष्करी विभागाचा पाणीसाठा पुर्णपणे मिळेल किंवा नाही, याची शाश्वती देता येत नाही.

तांत्रिक अडचणींमुळे मागील महिन्यात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सध्या सुरू असलेल्या आवर्तनामुळे शहराला दररोज एकवेळ मुबलक पाणी पुरवठा केला जात आहे.

बोर्ड प्रशासनाने पाण्याचा अपव्यय करणार्‍यांबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत यापूर्वीच दिल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर बगीचे, गाड्या धुणे आदींचे प्रमाण वाढत असते,त्याला वेळीच आळा घातला गेला पाहिजे.

मे महिन्यात पाण्याचे आवर्तन सुटणार आहे,तो पर्यंत लष्करी साठवण बंधारा हा देवळाली कराणसाठी संजीवनी ठरणार आहे, लष्कराने दारणा नदीपात्रात उभारलेल्या बंधार्‍यात पाणी साठवण केली जाणार आहे. सदरचे पाणी पुढील पंधरा दिवसांकरिता वापरावयाचे असल्याने त्याचे नियोजन आतापासून करणे गरजेचे आहे.

लष्करी विभागाने याबाबत सतर्कता बाळगत पाणी बचतीबाबत आधीच कृतिशील कार्यक्रम आखला आहे. बोर्ड प्रशासनेही ही बाब प्राधान्याने घेऊन तसे नियोजन आतापासून केले पाहिजे. बंधार्‍यातील पाणी मे अखेरपर्यंत पुरविण्याची जबाबदारी या दोन्ही संस्थांवर असून नागरिकांचाही त्यात मोठा सहभाग राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com