जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणाची बिकट वाट

साठ टक्के विद्यार्थी वंचित
ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण

नाशिक । विजय गिते

ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असला तरी अनेक विद्यार्थी मात्र यापासून वंचित आहे. दीड महिना उलटून गेल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास साठ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागत असल्याचे समोर अाले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची बिकट वाट असे चित्र जिल्ह्यात आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा वर्गांमध्ये भरविता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरी भागात चित्र चांगले असले तरी ग्रामीण भागात मात्र अजुही ६० टक्के विद्यार्थी अशा शिक्षणापर्यंत पोहोचलेच नसल्याचे समोर आले आहे.

सुविधांचा अभाव आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सुरू असलेल्या या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने केवळ ऑनलाइन लेक्चर्स घ्यावीत असं जाहीर केलं.परंतु त्यासाठी प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था केली नाही. ज्या शाळांकडे पुरेशा सुविधा नाहीत अथवा प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. त्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर ढकलली.

शिक्षकांनी घरातून अथवा मित्रांकडून झूम ॲप, गूगल ॲप ची माहिती करून घेतली. आपापल्या परीने आॕनलाइन शिक्षणाला सुरुवात केली. या शिक्षणात प्रचंड अडथळे येत आहेत.याबरोबरच पालकांच्या असमर्थतेमुळे ग्रामीण भागातील अनेक शाळांत ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यास असमर्थ ठरल्या आहेत.

माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत नुकताच जिल्हाभरातील शिक्षणाचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यातील बाराशे ७१ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांपैकी केवळ ४९९ शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचे निदर्शनास आले. अनेक शाळांनी पालकांच्या आर्थिक परिस्थितीचे कारण देत त्यांच्याकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे.करोनाचा हा काळ लवकरच संपेल आणि शिक्षकांना ऑनलाइनच्या त्रासातून बाहेर पडता येईल.याकडेच शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या प्रणालीत फक्त विदयार्थ्यांचाच विचार केला जातो आहे. आता वेळ आली आहे शिक्षकांवरील प्रचंड तणावाची अन् त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेची ! यावर शिक्षण विभाग लक्ष देईल काय ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com